मुंबईSanjay Raut News - पोलिसांनी ललित पाटील याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्याने संधी साधून तेथून पळ काढला. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी ललित पाटील याला पळून जाण्यास दादा भुसे यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दादा भुसे यांनी आरोप फेटाळले असले तरी आता यावर खासदार संजय राऊत यांनीदेखील मंत्री भुसे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. ते मुंबईत निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. गिरणा सहकारी साखर कारखान्यात 179 कोटींचा भष्टाचार झाला. त्यानंतर त्यांनी साधारण 200 कोटी रुपयांचा माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला. त्याला आम्ही सामोरे जाऊ. पण, त्याहीपेक्षा भयंकर प्रकरण समोर आलंय. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आधी प्रकरण बाहेर काढलं. ललित पाटील हा ड्रग्ज माफिया आहे.
उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा प्लॅन आहे का?-पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ललित पाटीलला तुरुंगातून ससून रुग्णालयात दाखल करण्याची काळजी कोणी घेतली? नाशिकच्या एका आमदारांच नावे पुढे आलं. त्यानंतर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अप्रत्यक्ष तर आमच्या सुषमा अंधारे यांनी तर दादा भुसे यांच थेट नाव घेतलं आहे. हातात पुरावे असल्याशिवाय आणि संपूर्ण माहिती असल्याशिवाय आमचे हे तिन्ही प्रमुख लोक बोलणार नाहीत. ललित पाटील या ड्रग्ज माफियाने नऊ महिने ससूनमध्ये पाहुणचार घेतला. त्यानंतर त्याला एकनाथ शिंदे गटाच्या एका मंत्र्याने त्याला पळून जायला मदत केली. त्या मंत्र्यांचे नाव काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले. नाशिकमध्ये ड्रग्ज माफिया आहे. उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा प्लॅन आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
मेळाव्याने देशामध्ये महत्व प्राप्त केलं-जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता. तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? अशी टीका दसरा मेळाव्यावरून शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली. याला उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की, शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत दसरा मेळावा हा शिवसेनेच्या विचारांचा अंगार घेऊनच होत असतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे दसरा मेळावा घेत आहेत. या मेळाव्याने देशामध्ये महत्व प्राप्त केलं आहे. त्यामुळे अंगार कोण भंगार कोण? हा येणारा काळ ठरवेल. तुमच्या मेळाव्याला येणारे लोक तुमचे विचार ऐकण्यासाठी येत असतील तर येऊ द्या. तुमच्या विचारांना आम्ही अंगार, भंगार म्हणणार नाही.