मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. खासदार संजय राऊतांनी यावरून फडणवीसांना खडेबोल सुनावले आहे. पोहरादेवी जागृत देवस्थान आहे. कोणीही तिची खोटी शपथ घेणार नाही. परंतु, राजकारणासाठी फडणवीस पोहरादेवीला खोटे पाडत आहेत. पोहरादेवीचा हा अपमान आहे, असा आरोप राऊतांनी केला. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटासोबत भाजपने केलेल्या युतीवर कानपिचक्या दिल्या.
2019 च्या सत्तातंराचा दाखला :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमात 2019 च्या सत्तातंराचा दाखला दिला. ठाकरेंमुळे शिवसेना-भाजप युतीत दरी निर्माण झाली. आता पोहरादेवीची खोटी शपथ घेत आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली होती. संजय राऊतांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ही यावेळी निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतली, असे म्हणणे हा पोहरादेवीचा अपमान आहे. तेथील समाजाच्या अनेक नेत्यांनी फोन केले आहेत. फडणवीस हे वारंवार आमच्या पोहरादेवीचा अपमान करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोहरादेवी हे तेथील जागृत देवस्थान आहे. तिची कोणीही खोटी शपथ घेणार नाही. परंतु, सत्तेच्या राजकारणासाठी पोहरादेवीला खोटे पाडत आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
आरोपांवरून फडणवीसांना आरसा :ठाकरेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी केल्याच्या मुद्द्यावर फडणवीसांनी अनेक आरोप केले होते. राऊतांनी या आरोपांवरून फडणवीसांना आरसा दाखवला आहे. तुम्ही राष्ट्रवादीबरोबर गेलात हा अधर्म, कुटनीती राजकारण. मग शिवसेना जेव्हा राष्ट्रवादीबरोबर गेली तेव्हा ते काय होते? विश्वासघात का, असा प्रश्न राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे. कुटनीती, चाणक्य नीती, विदुरनीतीचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे, अशी मागणी केली. तसेच फडणवीस वैफल्यग्रस्त झाले असून अशी चुकीची विधान करत आहेत. तुमचे हसे होत आहे, कृपया अशी विधाने करू नका, असा सल्ला राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. आगामी काळात कुटनीती वापरणाऱ्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे राऊत म्हणाले.