महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राममंदिराच्या नावानं पंतप्रधानांचे 'ते' पोस्टर श्रीरामभक्तांच्या भावना दुखावणारे, संजय राऊत यांची भाजपावर टीका - संजय राऊत नरेंद्र मोदी पोस्टर टीका

अयोध्येत बांधलेल्या श्रीराम मंदिराचे लोकार्पण २२ जानेवारीला होत आहे. याबाबत भाजपानं देशभरात फार मोठी तयारी केली आहे. अयोध्येत ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीरामाचा हात धरून मंदिरात घेऊन जात असल्याचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. या होर्डिंगवरून ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी त्याचबरोबर भाजपवर हल्लाबोल केला आहे. बाबरी मशीद पाडली तेव्हा पलायन करणारे, आज आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. असा टोला त्यांनी लगावला.

Sanjay Raut slammed BJP over banners of  PM Modi
Sanjay Raut slammed BJP over banners of PM Modi

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 1:16 PM IST

मुंबई -देशात फक्त एकच व्हीआयपी आहेत. त्यांचं नाव नरेंद्र मोदी! राममंदिराच्या नावानं त्यांचे भव्य पोस्टर्स सर्वत्र लागले आहेत. हे पोस्टर्स रामभक्तांच्या भावना दुखावणारे आहेत. त्यांनी यावर अगोदर बोलावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्रीरामांचं बोट धरून त्यांना श्री राम मंदिरात नेत आहेत. हा केवळ निर्लज्जपणा आहे. ते भाजपाचे नेते व पंतप्रधान आहेत. पण कोट्यावधी श्रीरामभक्तांच्या भावना दुखावणारे असे हे पोस्टर आहेत, असेही राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.


खासदार संजय राऊत म्हणाले की, राममंदिराच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता. म्हणून आज जे बोलत आहेत त्यांना बोलू द्या. त्यांना जो काही राजकीय इव्हेंट करायचा आहे, तो करू द्या. विष्णूचे तेरावे अवतार म्हणून मोदींना भाजपानं घोषित केलं आहे. ते प्रभू श्रीरामांचा हात धरून त्यांना मंदिरात नेत आहेत. हे तुमचं हिंदुत्व आहे का? आम्हीसुद्धा अयोध्येत जाणार आहोत. परंतु २०२४ नंतर कोणाचं हिंदुत्व आहे, हे कळेल असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

सत्तेचा माज दाखवू नका-देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले आहे की, तुमच्या छाताडावर बसून राम मंदिर बनवण्यात आले. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे सर्व डरपोक आहेत. बाबरीचे घुमट कोसळताना पळून जाणारी ही सर्व लोक आहेत. तेव्हा ते म्हणाले होते की, हे आमचं काम नाही. हे आमचं कृत्य नाही. आम्हाला माफ करा. तेव्हा तुमची छाताडं कुठे गेली होती? आता सत्तेमुळे ती ५६ किंवा ६० इंचाची झाली आहेत. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. हा सत्तेचा माज दाखवू नका. प्रभू श्रीरामाचे आम्ही भक्त असून कुठल्याही स्वार्थाविना शिवसेना या लढ्यामध्ये उतरली होती. बाळासाहेब ठाकरेसुद्धा या लढ्यात होते.

हिंदुत्वाच्या बाबतीत व्हीआयपी कोण व ढोंगी कोण?खासदार राऊत पुढे म्हणाले की, आम्ही सर्वसामान्य भक्त असल्यानं आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो होतो. तेव्हा आजचे व्हीआयपी कुठे होते? असा सवालही संजय राऊत यांनी केला. तेव्हा हे सर्व व्हीआयपी पाय लावून पळून गेले होते. तेव्हा आमचा काय संबंध नाही, असे सांगत होते. बाबरी आम्ही पाडली नाही, असे खाक्या वर करून सांगत होते. तेव्हा हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली की, बाबरी पाडणारे शिवसेनेचे असतील तर मला त्याचा गर्व आहे. भारतीय जनता पक्षाने डरपोकपणाने बाबरी पाडल्याचं खापर शिवसेनेवर फोडले. ती जबाबदारी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली. तेव्हाच समजलं की हिंदुत्वाच्या बाबतीत व्हीआयपी कोण व ढोंगी कोण?

श्रीराम मंदिराच्या लोकार्पणासाठी उद्धव ठाकरे यांना कुणी निमंत्रण देण्याची आवश्यकता नाही. तुमच्या अगोदरपासून आम्ही अयोध्येत आहोत. आता अशोक सिंघलजी विश्व हिंदू परिषदेचे नाहीत. त्यांना विचारा की, त्यांच्या मातोश्रीवर कशा पद्धतीच्या बैठक झाल्या आहेत-खासदार संजय राऊत


पंतप्रधान पदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे-वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. जागा वाटपा संदर्भात अशा प्रकारचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित आहे व राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीला आम्ही अत्यंत सन्मानाने एकत्र घेऊ. तसेच आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत. राहुल गांधी, प्रियंका गांधी, खर्गे, ठाकरे असे अनेक चेहरे आहेत. परंतु भाजपाकडे नरेंद्र मोदी सोडलं तर दुसरा चेहराच नाही आहे, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

हेही वाचा-

  1. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यात येणार का? संजय राऊत यांनी केलं मोठं वक्तव्य
  2. संजय राऊतांना कायदा, व्यवस्था, नियम कशाचेही ज्ञान नाही; प्रवीण दरेकरांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details