मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच शिवसेना संसदीय नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन समीकरणे उदयाला येण्याच्या चर्चांना उधाण आले. या भेटीमुळे शिवसेना सत्तास्थापनेसाठी काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊन भाजपला ठेंगा दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राऊतांनी घेतली पवारांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - शिवसेना दाखवणार भाजपाला ठेंगा
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच शिवसेना संसदीय नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सकाळी भेट घेतली.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी भाजपकडून शिवसेनेला म्हणावी तशी ऑफर आणि तशी वागणूक अद्यापही मिळालेली नाही. त्यातच केवळ तोंडी चर्चा सुरू असून शिवसेनेने भाजपसोबत जाण्याची कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही. आज सकाळपासून सिल्वर ओक हा बंगला राजकीय वर्तुळाचे केंद्र बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये पवार यांनी आपल्या मित्रपक्षाला "वेट अँड वॉच"ची भूमिका घेण्याचे सांगितले असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेतल्यानंतर सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचा पाठिंबा मिळाला तर राज्यात सहजपणे शिवसेना सत्ता स्थापन करू शकते असा कयास आता लावला जात आहे. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास राज्यात पक्षीय बलाबल हे 164 वर जाणार असून त्यात अपक्ष आणि इतरांची भर पडल्यास शिवसेनेला मजबूत सरकार स्थापन करता येऊ शकते असाही कयास लावला जात आहे.
या पार्श्वभूमीवर आज शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची बोलले जात आहे. मात्र, माध्यमांशी बोलताना ही भेट केवळ दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी घेतली असून या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे राऊत यांनी सांगितले.