मुंबई - 'कोरोना उपचारादरम्यान ऑक्सिजन तुटवड्याचे संकट पाहता सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले. चांगली उपाययोजना कशा करता येतात हे मुंबई महानगरपालिकेच्या अनुभवावरून शिका आणि त्यांचा वापर करा, असे एका सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले. मुंबईकडून शिका म्हणजेच महाराष्ट्राकडून शिका असा त्याचा अर्थ होतो. कोरोनाशी लढण्यासाठी व तो नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र मॉडेलचा वापर करावा, असे मी सातत्याने सांगत आहे. जर महाराष्ट्र मॉडेलचा वापर केला नाही तर देशातला कोरोना नियंत्रणात येणार नाही,' अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाची स्तुती ही विरोधकांना जोरदार चपराक असल्याचे राऊत म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय दुर्दैवी -
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. न्यायालयाचा हा निर्णय दुर्देवी आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, अजित पवार या सर्वांनाही मराठा आरक्षण पाहिजे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जो मार्ग दाखवला होता त्याच मार्गावरती आताचे सरकार चालले होते. त्याच मार्गाने पुढील काम चालू आहे. त्यांनीच नेमलेले वकील कायम आहेत. त्यामुळे आता राजकारण न करता कशा प्रकारे मार्ग काढता येईल, यासाठी विरोधकांनी देखील पुढे आले पाहिजे. आपण सर्व राष्ट्रपतींकडे जाऊ, असे राऊत म्हणाले.
पंतप्रधानांच्या भेटीसाठी प्रयत्न करावेत -
छत्रपती संभाजी राजे मराठा आरक्षण प्रकरणी गेल्या एक वर्षापासून पंतप्रधान मोदी यांची भेट मागत आहेत. त्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मोदींच्या भेटीला जायचे आहे. जर, सर्वोच्च न्यायालय सांगत असेल की, आरक्षणाचा विषय पंतप्रधानांच्या हातात आहे. तर, या भेटीसाठी आणखी प्रयत्न करावेत, असे राऊत म्हणाले.