मुंबई -जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचे प्राबल्य वाढते तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो, असे परमेश्वराने अभिवचन दिलेले आहे; परंतु ते अभिवचन या कलियुगात कधी खरे होणार? आज देशात हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे, पण धर्माचे राज्य आहे काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी सामनाच्या 'रोखठोक'मधून उपस्थित केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मंदिरे उघडण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र तसेच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण यासह राजस्थानमधील पुजाऱ्याची गोळय़ा घालून केलेली हत्या आणि उत्तर प्रदेशमधील चार साधूंची हत्या या मुद्द्यांवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.
हाथरस येथे एका मुलीवर बलात्कार झाला आणि तीची हत्या करण्यात आली. हे सर्व प्रकरण आधी मीडियाने आणि राजकारण्यांनी वणव्यासारखे पेटवले. आता ते त्यांनीच शांत केले. तसेच पालघर येथे दोन साधूंचे हत्याकांड जमावाने केले. त्यावर देशात वादळ उठवण्यात आले. पण गेल्या चारेक दिवसांत उत्तर प्रदेशात चार साधू व राजस्थानात एका पुजाऱयाची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. राजस्थानात तर पुजाऱयास जिवंत जाळले. जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात मीडिया आहे. पालघरमध्ये साधूंवर हल्ला झाला तेव्हा तो अधर्म, पण इतरत्र तो होतो तेव्हा नेहमीची घटना हे कसे शक्य आहे, अशा वेळी परमेश्वर कुठे असतो, असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.
नरेंद्र मोदी हे भगवान श्रीकृष्ण आणि अमित शाह हे अर्जून आहेत. असा त्यांच्या भक्तांचा समज असेल, तर त्यांचे काहीही चुकत नाही. पण खऱ्या धर्मस्थापनेचे आणि देशावरील संकटे दूर करण्याचे काम त्यांनी करावे इतकीच अपेक्षा आहे, असा खोचक टोलाही त्यांनी भाजप समर्थकांना लगावला आहे.