महाराष्ट्र

maharashtra

एका नटीसाठी किंचाळणाऱ्यांना रामराज्यातील बेटी अस्पृश्य का? - शिवसेनेचा सवाल

By

Published : Oct 4, 2020, 7:01 AM IST

Updated : Oct 4, 2020, 7:26 AM IST

हाथरस बलात्कार प्रकरणात देशभरातील नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. मात्र, या प्रकरणात यूपी सरकार आणि तेथील पोलिसांनी जी भूमिका घेतली ती संतापजनक आहे. याच बरोबर माध्यमांनी देखील सुशांत, कंगना यांच्या बाबत जी तत्परता दाखवली ती या प्रकरणात दाखवली नाही. यावरून खा. संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून योगी सरकारसह माध्यमे आणि जातीय बुरखा पांगरलेल्या समाजावर आगपाखड केली आहे.

Saamana Rokhthok
एका नटीसाठी किंचाळणाऱ्यांना रामराज्यातील बेटी अस्पृश्य का?

मुंबई - बेटी बचाव’च्या नारेबाजीत एका बेटीवर बलात्कार झाला. हिंदू मुलींना पळवून बलात्कार व हत्या करण्याचे प्रकार पाकिस्तानात घडतात. ते सर्व आता उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडले. राहुल गांधींना धक्काबुक्की झाली. हे कसले स्वातंत्र्य! एका नटीसाठी एक कायदा, बेटीचा देह मात्र विटंबना करून जाळला जातो. त्यावर आता कोणीच आवाज उठवत नसल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून करण्यात आली आहे.

काय म्हणाले संजय राऊत-

मुंबईत एका नटीचे बेकायदेशीर बांधलेले ऑफिस तोडले म्हणून ज्यांना न्याय, अन्याय, महिलांवरील अत्याचाराच्या उचक्या लागल्या ते सर्व लोक पीडितेच्या बेकायदेशीर पेटवलेल्या चितेबाबत थंड आहेत.‘बेटी बचाव’वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी ‘बचाव… बचाव’ असा आक्रोश करीत तडफडून मेली. मात्र, तिला न्याय मिळावा म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच ‘काय हा अन्याय?’ असे बोंबलणारा ‘मीडिया’देखील कंठशोष करताना का दिसला नाही? असा सवाल करण्यात आला आहे.

हाथरस प्रकरणातील पीडितेची दखल न घेण्यामागे ती ड्रग्ज घेत नव्हती, स्टार किंवा सेलिब्रेटी नव्हती, किंवा झोपडीत राहत होती व तिने कोटय़वधी रुपये खर्च करून कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केले नव्हते. तिचे कोणाबरोबर ‘अफेयर’ नव्हते. ती एक साधी सरळ मुलगी होती. त्यामुळे तिच्या देहाची रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर चिता पेटवून राख करण्यात आली. हे सर्व योगींच्या रामराज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात घडले. पण हाथरसला कुणी ‘पाकिस्तान’ म्हटल्याचे अजून तरी दिसले नाही!, असे म्हणत मुंबई बाबतच्या वक्तव्यानंतर आता तोंडास कुलूप लावून बसलेल्या कंगना रणौतवरही निशाणा साधला आहे.

महिनाभरापूर्वी पंतप्रधान मोदींनी रामजन्मभूमीची पूजा केली. त्यावेळी तेथे श्रीरामाबरोबर सीतामाईचाही वावर होता. पण त्याच भूमीवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघडय़ावर टाकून तडफडून मेली. हे सर्व त्याच उत्तर प्रदेशात घडले. पण अशा प्रकारची घटना महाराष्ट्रासारख्या राज्यात घडली असती तर एवढय़ात सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी झालीच असती, असे ही सामनातून म्हटले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाच्या सन्मानाचा, सुरक्षेचा मुद्दा समोर आणला होता. तोच महिला आयोग ‘हाथरस’ प्रकरणात चूप बसला. हाथरसच्या बलात्कार पीडितेचा आक्रोश दिल्लीपर्यंत पोहोचूनही काहीच केले नाही. हा सर्वच प्रकार धक्कादायक असल्याचे म्हणत राष्ट्रीय महिला आयोगाच्या दुटप्पी भूमिकेवर सामनातून निशाणा साधण्यात आला आहे.

रामराज्यात अमानुषता कशासाठी?

उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ आहेच. तेथे आता एक हजार एकरवर फिल्मसिटी उभारली जात आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील अनेक राण्या-महाराण्या यापुढे लखनौ, कानपूरलाच मुक्कामास जातील. यापैकी एखाद्या राणीने ‘योगीराज’ला पाकिस्तान किंवा जंगलराजची उपमा दिली तरी तेथील भाजप कार्यकर्ते संयमाने घेतील व एखाद्या राणीचे बेकायदेशीर बांधकाम तोडायला सरकारी फौजफाटा पाठवणार नाहीत. मात्र, रामराज्यात जणू एक सीतामाईच तडफडून मरण पावली. त्यानंतर दिल्लीपासून 200 किलोमीटर दूर हाथरस येथे पहाटे पोलिसांनीच गुपचूप तिची चिता पेटवली. तिच्या नातेवाईकांना घरातच कोंडून ठेवले. अॅम्बुलन्समधून मुलीचा मृतदेह जाळण्यासाठी नेत आहेत हे समजताच त्या मुलीच्या आईने स्वतःला अॅम्बुलन्सवर झोकून दिले. तेव्हा पोलिसांनी तिला फरफटत दूर नेले. हे एवढे भय, एवढी दहशत, इतकी अमानुषता कशासाठी? असा सवालही रामराज्य चालवणाऱ्या योगी आदित्यांना केला आहे.

महिलांना न्याय त्यांचे समाजातील स्थान पाहून मिळतो काय? देशातल्या मीडियावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे प्रकरण आहे. कंगना प्रकरणात महिनाभर संपूर्ण मीडियास ‘न्याय द्या’ या प्रेरणेने पछाडले होते. वृत्तवाहिन्यांवर दुसरा कोणताच विषय नव्हता. पण हेच कोकलणारे लोक ‘हाथरस’ प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाला, केंद्र सरकारला, योगी सरकारला प्रश्न विचारताना दिसत नाहीत. हाथरस कन्येचा आक्रोश त्यांच्या कानाचा पडदा फाडू शकला नसल्याची टीकाही माध्यमांवर केली आहे.

मग हाथरसची कन्या ‘अस्पृश्य’ का राहिली?

2012 साली दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कारकांड घडले तेव्हा संपूर्ण भाजपा रस्त्यावर उतरला होता. मीडियाने निर्भयासाठी ‘न्याय’ देणारी यंत्रणाच उभारली होती. निर्भया तेव्हा सगळय़ांचीच बहीण व मुलगी झाली. मग हाथरसची कन्या ‘अस्पृश्य’ का राहिली? की ती दलित असल्यामुळेच न्यायापासून वंचित राहिली?

आठवले विनोदाचा विषय; आंबेडकरी विचारांचा हा विध्वंस -

रामदास आठवले हे सध्या विनोदाचा विषय ठरत आहेत. ते कंगना राणावतला घरी जाऊन भेटले व त्यांचे कार्यकर्ते आधी विमानतळावर तिच्या स्वागतासाठी पोहोचले, पायल घोष या नटीस घेऊन ते राज्यपालांना भेटले. मात्र हाथरसची एक दलित कन्या मृत्यूशी झुंज देत होती, तिच्यावर अत्याचार झाला; तेव्हा आयुष्यमान आठवले नटय़ांच्या घोळक्यात भलतेच उद्योग करीत होते. देशातील दलित चळवळ, आंबेडकरी विचारांचा हा विध्वंस आहे.

एका ‘निर्भया’साठी कधीकाळी देश रस्त्यावर उतरला होता हे इतक्या लवकर मोदींचे सरकार विसरून गेले. 2014 ते 2019 या काळात 12,257 गँगरेप उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश या चार राज्यांत झाले आहेत, पण जात, धर्म, राजकीय प्रतिष्ठा पाहून अशा प्रकरणांत न्याय केला जातो. एका नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका ‘बेटी’वर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे. भावनेचा कडेलोट आणि कायद्याचे वस्त्रहरण झाले आहे.

Last Updated : Oct 4, 2020, 7:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details