मुंबई Sanjay Raut On Chadrashekhar Bawankule: आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'एक्स'वरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chadrashekhar Bawankule) यांचा मकाऊतल्या कॅसिनोमधील फोटो पोस्ट केला होता. राऊतांच्या या पोस्टनंतर राऊत आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर राऊतांच्या पोस्टला उत्तर देताना भाजपाने आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) फोटो पोस्ट करत "या ग्लासमधून आदित्य ठाकरे कोणत ब्रँन्ड पित आहेत?, हे संजय राऊत यांनी सांगावे", असा पलटवार भाजपाने राऊतांवर केला होता. तसंच या फोटोबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुलासा केला होता. 'मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे'. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकत्र आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे. परंतु यानंतर पुन्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत, चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपावर जोरदार प्रतिहल्ला केला आहे.
अजून 27 फोटो आहेत: माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे कुठे आणि कोणासोबत गेले होते, ते मला माहीत आहे. ते म्हणतात की, मी कुटुंबासोबत गेलो होतो. पण अशी किती कुटुंब आहेत? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. याबाबत माझ्याकडे आणखी व्हिडिओ आणि फोटो आहेत. अजून माझ्याकडे 27 फोटो आहेत. पण राज्यातील परिस्थिती काय आहे, याचं मला भान आहे. माझ्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, भाजपाचे संस्कार नाहीत. त्यामुळं मी त्याचं भान राखणार आहे, असा टोला देखील राऊतांनी भाजपाला लगावला.