मुंबई -लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत व चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात लष्कराच्या २० जवानांना वीरमरण आले. गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमधील सीमाभागात तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले जात आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदी यांना धारेवर धरले असून त्यांनी सत्य सांगण्याचे आवाहन केले आहे.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, 'चीनच्या घुसखोरीला केव्हा चोख प्रत्युत्तर मिळणार आहे? गोळीबार न होता आपले २० जवान हुतात्मा झाले आहेत. आपण काय केले? चीनचे किती सैनिक मारले गेले? चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे का? पंतप्रधान जी, संघर्षाच्या या काळात देश तुमच्या सोबत आहे. पण, सत्य काय आहे? ते सांगा. काहीतरी बोला. देशाला सत्य ऐकायचे आहे.'
दुसरीकडे, एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत म्हणाले की, भारत-चीन सीमेवर जे काही घडले त्यासाठी आम्ही जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही. जवानांना वीरमरण आले त्यासाठी आपण सर्वजण जबाबदार आहोत. पंतप्रधान जे निर्णय घेतील, त्याला सर्व पक्ष पाठिंबा देतील, पण काय घडले आहे त्यांनी खरे सांगावे, असे म्हटले आहे.