मुंबई - '28 वर्षानंतर बाबरीचा जो निर्णय आला आहे, त्याचे मी स्वागत करतो. लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांना मुक्त केले आहे. हाच निर्णय अपेक्षित होता. झालेल्या सर्व गोष्टींना विसरून गेले पाहिजे. बाबरीचा विद्ध्वंस झाला नसता, तर राम मंदिर बघायला मिळाले नसते,' अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बाबरी निकालानंतर दिली. त्यांनी हाथरस प्रकरणी योगी सरकारवर टीकाही केली.
'बाबरीचा विद्ध्वंस झाला नसता, तर राम मंदिर बघायला मिळाले नसते' - संजय राऊत बाबरी निर्णय मत
अयोध्यामधील बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी तब्बल 28 वर्षांनंतर न्यायालयाने आज निर्णय जाहीर केला. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली, असे निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. योगींच्या राज्याला रामराज्य म्हटले जाते आणि तिथे एका महिलेवर अत्याचार होऊन खून होतो, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात एखाद्या अभिनेत्रीच्या घरचे कौल जरी उडवले तरी, अन्याय म्हटले जाते. जे महाराष्ट्रावर अन्यायाचा ठपका ठेवत होते, आता ते कुठे आहेत? असा प्रश्न राऊत यांनी केला.
एका अभिनेत्रीसाठी सर्वजण समोर येतात. सोशल मीडियावर मोहीम चालवली जाते. आता एका मुलीवरती अत्याचार झाला तर, तिच्यासाठी न्याय मागण्यासाठी कोणीच समोर येत नाही. अशा प्रकरणाचा व तेथील प्रशासनाचा आम्ही निषेध करतो, असे सांगत संजय राऊत यांनी, मायावती कुठे आहेत? प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले कुठे गेले? असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला.