मुंबई : शिंदे गटाकडून माध्यमात दिलेल्या जाहिरातमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले की, अलीकडच्या काळात असे विनोद महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहेत. महाराष्ट्राला अशा विनोदांचे वावडे नाही. ही जाहिरात सरकारची आहे की खासगी आहे हे आपल्याला माहित नाही. जाहिरात सरकारी असेल तर त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने उत्तर द्यायला हवे. कारण, ही जर जाहिरात सरकारचे असेल तर 105 आमदार असलेल्या पक्षाचा पाठिंबावर हे सरकार उभे आहे. त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे व देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी उत्तर दिले पाहिजे."
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सर्व वृत्तपत्रांमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून फक्त एका सर्वेची जाहिरात देण्यात आली. त्यामुळे हे जे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, ते कोट्यावधी रुपये सरकारचे आहेत. सरकारच्या तिजोरीतील आहेत. याच्यावर सुद्धा लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. हा सर्वे नक्की कुठे केला गेला? महाराष्ट्रातला हा सर्वे आहे, असे मला वाटत नाही. एक तर हा सर्वे सरकारी बंगल्यात केला असावा. मुख्यमंत्र्यांच्या तिकडल्या बंगल्यापुरता हा सर्वे असावा किंवा गुजरातमध्ये केला असावा. महाराष्ट्रातला असला सर्व येऊ शकत नाही. सर्वे खरा की खोटा आम्हाला यात पडायचे नाही.
साधा बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख नाही:कोट्यवधींच्या जाहिरातबाजीमुळे स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणणाऱ्या लोकांनी मोदीचा फोटो टाकला. पण बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकला नाही. म्हणजे ही सेना मोदी सेना आहे. तुम्हाला इतका आनंद झाला. या आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरला आहात. साधा बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख नाही. म्हणजे ही शिवसेना ओरिजनल शिवसेना नसून मोदी शहांची सेना आहे हे स्पष्ट होते.