मुंबई Sanjay Raut On Rahul Narvekar : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आंतरराष्ट्रीय परिषदेला घाना देशात जाणार आहेत. त्यावरुन आता उबाठा गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी राहुल नार्वेकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राहुल नार्वेकर हे लोकशाही मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेला जात आहेत. मात्र राज्यात लोकशाहीचा खून झाल्याचा हल्लाबोल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत हे मुंबईत त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.
काय म्हणाले संजय राऊत :लोकशाही मजबूत करण्यासाठी ओम बिर्ला यांच्या नेतृत्वात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घाना इथं आंतरराष्ट्रीय परिषदेत जात आहेत. या शिष्टमंडळात राहुल नार्वेकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र महाराष्ट्रात लोकशाहीची अवस्था काय आहे, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. इथल्या लोकशाहीची दुरवस्था झाली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आहे. मागील एका वर्षापासून राज्यघटनेच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात सरकार चालवण्यात येत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.