महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यात येणार का? संजय राऊत यांनी केलं मोठं वक्तव्य - संजय राऊत लोकसभा निवडणूक निकाल सर्वे प्रतिक्रिया

Sanjay Raut news ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राममंदिर, काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था आणि लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाजपाव सडकून टीका केलीय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेदेखील इंडिया आघाडीत येणार असल्याचा विश्वासदेखील खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

Sanjay Raut on Praksah Ambedkar
Sanjay Raut on Praksah Ambedkar

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 1:03 PM IST

Updated : Dec 25, 2023, 1:34 PM IST

मुंबईSanjay Raut news- ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अयोध्येच्या राममंदिरावरून पुन्हा एकदा भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ४० प्लस जागा जिंकणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी व इंडिया आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस हायकंमाड सोनिया गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची अनुमती असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.



काश्मीरवर सरकारचे लक्ष कुठे आहे?काश्मीरच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, काश्मीरची परिस्थिती कलम ३७० हटवल्यानंतर सुद्धा व्यवस्थित नाही. हे सर्व देशाला माहित आहे. आजसुद्धा एका निवृत्त एसीपीची हत्या झाली आहे. काश्मीरमध्ये हल्ला झाला. त्यात ५ जवानांना वीरमरण आले. कश्मीरमध्ये जवान सुरक्षित नाहीत. सुरक्षाकर्मी सुरक्षित नाहीत. पोलिसांची हत्या होत आहे. मग हे सरकार काश्मीर सुधारलं आहे? हे कुठल्या आधारावर सांगत आहेत? मागील तीन ते चार महिन्यांत काश्मीरमध्ये २५ पेक्षा जास्त अधिकाऱ्यांची हत्या झाली आहे. पण सरकार मात्र मुख्यमंत्री बनवण्यात व मुख्यमंत्री बदलण्यात व्यस्त असल्याचंही खासदार राऊत यांनी सांगितलं आहे.



मोदी यांच्याविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरलो-आम्ही या देशात सुरू असलेल्या तानाशाही विरोधात मैदानामध्ये येऊन खुलेपणाने लढणारे आहोत. उद्योगपती अदानी यांच्याविरोधात सर्व बोलतात. परंतु त्यांच्या विरोधात मुंबईच्या रस्त्यावर लाखोंचा मोर्चा आम्ही काढला. अदानी म्हणजे मोदी यांच्याविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही उतरणार आहोत. देशात राहुल गांधी हे संघर्ष करत असताना त्यांच्यासोबत लढणार असा एक नेता आहे जो उघडपणे रस्त्यावर लढाई लढत आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे. तसेच इंडिया आघाडीचे सर्व नेते उद्धव ठाकरे यांना मानतात. त्यांचा आदर करतात. दिल्लीत असताना सर्व नेते त्यांच्या भेटीसाठी आले. सत्यपाल मलिक, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, लालू यादव या सर्वांनी त्यांची भेट घेतली. सर्वांना त्यांच्याविषयी प्रेम व आदर आहे, असेही राऊत म्हणाले.



४०हून अधिक जागा जिंकणार हा आमचा आत्मविश्वास-येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडी २८ जागा जिंकेल असा एक सर्वे रिपोर्ट आला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, २८ हा आकडा आम्हाला कोणीतरी सांगितला. पण आम्ही ३५ ते ४० जागांची तयारी केली आहे. काही प्रमुख नेते लोकसभेच्या अनुषंगाने शिवसेनेत किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत. तेव्हासुद्धा गणितं बदलली जातील. आम्ही किमान ४० जागांवर लोकसभेच्या निवडणुका जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे. तर भाजपा राज्यात लोकसभेसाठी मिशन १४५ सुद्धा करू शकते. देशामध्ये ते १ हजार जागा सुद्धा जिंकू शकतात. भाजपा हवेतला पक्ष आहे. तो जमिनीवरचा पक्ष नाही. जो पक्ष मिंधे व अजित पवार या दोन कुबड्यावर उभा आहे, त्यांनी ४५ जागा जिंकण्याची भाषा करावी हे हास्यास्पद आहे. तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला.



प्रकाश आंबेडकर यांची ताकद सोबत असावी-वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत संजय राऊत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर व आमच्या भूमिकेत फरक नाही. प्रकाश आंबेडकर हेसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने जाणारे त्यांचे नातू आहेत. या देशातील कायदा पायदळी तुडवला जाऊ नये. या देशातील मोदींची हुकूमशाही ही लोकशाही पद्धतीने संपवावी, असे मानणारे प्रकाश आंबेडकर आहेत. त्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू आहे. लवकरच शिवसेना, काँग्रेस, एनसीपी व वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत.

वंचित बहुजन आघाडी व शिवसेना एकत्र आहेतच. आमच्या दोघांची युती जाहीर झाली आहे. फक्त भविष्यात महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत त्यांना कसं सामावून घेता येईल याविषयी इंडियाच्या बैठकीत स्वतः उद्धव ठाकरे यांनी हा विषय चर्चेला आणला होता. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासोबत आमची चर्चा झाली होती. प्रकाश आंबेडकर यांची ताकद ही महाविकास आघाडी व इंडिया आघाडीसोबत असावी याबाबत राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार या सर्वांचं एकमत आहे-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

वंचित बहुजन आघाडी व शिवसेना एकत्र-हुकूमशाहीचे हात बळकट होतील, असा कुठलाही निर्णय प्रकाश आंबेडकर घेणार नाहीत. प्रकाश आंबेडकर हे जर त्यांच्या पक्षाचा विस्तार करत असतील त्यामध्ये वाईट वाटण्याचं काही कारण नाही. शिवसेनेच्या बरोबरीनं या महाराष्ट्रामध्ये मोदींच्या हुकूमशाहीवर जर कोणी हल्ले करत असेल किंवा त्या दृष्टीने पाऊल टाकत असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत. हे विसरता येणार नाही. नरेंद्र मोदी व संविधान याबाबतीत ते कुठलीही चुकीची भूमिका घेतील असे या महाराष्ट्राला वाटत नाही.



शिवसेनेच्या वतीनं एक कोटी रुपये दिले-अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रत्येक वेळेला भाजप रामलल्लाच्या नावाने मतं मागतात. जणू काही राम मंदिराची मालकी यांच्याकडेच आहे. अशा पद्धतीचं त्यांचे राजकारण सुरू आहे. ही त्यांची प्रॉपर्टी आहे का? हा एक प्रश्न आहे. रामलल्लाच्या मंदिरासाठी सर्वात अगोदर शिवसेनेनं दान दिलं. तेव्हा अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीने एक कोटी रुपये दिले आहेत. अयोध्येचा सातबारा हा रामाच्या भक्तांच्या नावावर आहे. भाजपाच्या नावावर नाही.

हेही वाचा-

  1. 'त्या' डॉक्टर महिलेसोबतचे फोटो दाखवायचे का? नितेश राणेंचा संजय राऊतांबाबत मोठा खुलासा
  2. संजय राऊतांना कायदा, व्यवस्था, नियम कशाचेही ज्ञान नाही; प्रवीण दरेकरांची टीका
Last Updated : Dec 25, 2023, 1:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details