महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut On PM Modi : 'उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये जाऊन बोला त्या सरकारने नेमकं काय केलं?' मोदींच्या शिर्डीतील सभेवर संजय राऊतांची टीका - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील

Sanjay Raut On PM Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डीत झालेल्या सभेवर जोरदार टीका केली आहे. तसंच स्वयंघोषित शिवसेनेचा मुख्यमंत्री मात्र भांडी घासतात भाजपाची, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधलाय.

Sanjay Raut On PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संजय राऊत

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 2:02 PM IST

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

मुंबई Sanjay Raut On PM Modi : गुरुवारी (26 ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृषीमंत्री पदाच्या कार्यकाळावर टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केलं. पण सध्याचं सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधानांच्या या विधानाचा आता खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत : आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की, पंजाबराव देशमुख यांच्यानंतर देशाला लाभलेले उत्तम कृषीमंत्री म्हणजे शरद पवार. शरद पवारांनी कृषीमंत्री म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींना जेवढी मदत केली, तेवढी मदत आता पंतप्रधान असून मोदींनी केली नाही. तुम्ही काय केलं? या महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या आपल्या काळात झाल्या. तीन काळे कृषी कायदे आपण आणले. हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचं अपयश आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणार होतात, पण ते सिंगलही झालं नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आपण लागू केल्या नाहीत आणि महाराष्ट्रात येऊन आपण शरद पवारांवर बोलायचं? उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जाऊन बोला. त्या सरकारनं नेमकं काय केलं? देशातील शेतकरी संकटात आहे आणि याला जबाबदार नरेंद्र मोदी सरकार आहे, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा : पंतप्रधानांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी शिंदेंनी देखील आपल्या भाषणात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर टीका केली. यावर बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेना हे नाव त्यांनी घेऊ नये. स्वयंघोषित शिवसेनेचा मुख्यमंत्री मात्र भांडी घासतात भाजपाची. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असू शकत नाही. थोडा तरी स्वाभिमान असेल तर महाराष्ट्राविषयी बोला. स्वतःच्या पक्षाविषयी बोला. पण, रोज सकाळी उठल्यापासून मोदी शाहाचं स्त्रोत्र त्यांनी सुरू केलंय. आपण शिर्डीला येता साईबाबांच्या दरबारात खोटं बोलता? गुमराह करता? आणि दुसऱ्यांकडे बोट दाखवता, असा घणाघातही त्यांनी केला.

जरांगे पाटीलांच्या उपोषणावरही दिली प्रतिक्रिया : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया देत राऊत म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रमध्ये एक तरुण नेता उपोषणाला बसलाय. शब्द देऊन देखील सरकारनं तो पाळला नाही. मोदींनी मुख्यमंत्र्यांकडं बोट दाखवून त्यांना विचारायला पाहिजे होतं की, तुम्ही जरांगे पाटलांना दिल्लीत घेऊन का आला नाही? पण, यांच्या व्यासपीठावर भ्रष्टाचाराचा आरोप असलेले आणि भ्रष्टाचारात बरबटलेले लोक बसले होते आणि हे भ्रष्टाचार नष्ट करायला निघालेत, असाही टोला राऊतांनी लगावला.

हेही वाचा -

  1. Sanjay Raut On Eknath Shinde : नपुंसक कांदे खातो, शिंदे गटाच्या दसरा मेळ्याव्यावरून संजय राऊत यांची टीका
  2. Manoj Jarange On PM : मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदींचं मौन; मनोज जरांगे पाटील म्हणाले...
  3. Prakash Ambedkar on Pm Modi : प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका; म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details