मुंबई Sanjay Raut on PM Modi : आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. तसंच अटल सेतूअटल सेतू अर्थात शिवडी न्हावा-शेवा सी लिंकचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार आगपाखड केलीय. देशात अनेक प्रकल्प अपूर्ण असताना, केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्घाटनाचा धडाका सुरू आहे, अशी टीका खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केलीय.
राम मंदिराचं काम अपूर्ण, तरी सुद्धा : आज होणाऱ्या उद्घाटन समारंभावरुन संजय राऊत म्हणाले की, "मविआ सरकारच्या काळात न्हावा-शेवा सी लिंकच्या कामाला गती मिळाली. याचं लोकार्पण आधीच व्हायला पाहिजे होतं. लोकांना कोंडून ठेवणं, लोकांची आडवणूक करणं हे चुकीचं आहे. आज पंतप्रधानांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय. प्रकल्प पूर्ण असो किंवा अपूर्ण त्याचं लोकार्पण होतंय. जसं अयोध्येतील राम मंदिराचं काम अजून पूर्ण झालेलं नाही, तरीसुद्धा त्याचं उद्घाटन केलं जातंय. कारण आता निवडणुका जवळ येत आहेत, म्हणून प्रकल्पांचं उद्घाटन होतंय."
म्हणून 4 शंकराचार्यांचा विरोध : राम मंदिराचं काम अपूर्ण अवस्थेत आहे, तरीसुद्धा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून त्याचं लोकार्पण होत असल्याचं म्हणत या लोकार्पण सोहळ्याला येण्यास चार प्रमुख शंकराचार्यांनी विरोध केलाय. त्या अपूर्ण मंदिर सोहळ्याच्या लोकार्पणाला येण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केलीय. यावर संजय राऊत म्हणाले, "मला असं वाटतं स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या नेत्यांनी याचा विचार करायला पाहिजे. सध्या भाजपाला जसं हवं तसं ते करुन घेत आहेत. शेवटी राजकारण आहे, पण रामाच्या नावानं आपण किती काळ राजकारण करणार, कुठेतरी त्याला पूर्णविराम मिळाला पाहिजे."
सगळ्यात मोठे शंकराचार्य नरेंद्र मोदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, "या देशात सगळ्यात मोठे शंकराचार्य संत नरेंद्र मोदी आहेत, असं भारतीय जनता पक्षाला वाटत असावं. त्यामुळं शंकराचार्यांच्या मताला आणि भूमिकांना त्यांनी फार किंमत दिली नसावी. राम मंदिर हे कारसेवकांच्या रक्तातून, त्यागातून आणि बलिदानातून उभं राहिलंय, असं भाजपाला वाटत नाही. तसंच सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानं राम मंदिर उभं राहिलं, असं सुद्धा भाजपाला वाटत नसावं. ते फक्त आणि फक्त एका व्यक्तीमुळंच उभं राहिलंय, असं भाजपाला वाटतंय."
राम कुरघोडीचं साधन आहे का : मोदींच्या नाशिक दौऱ्यावर बोलताना राऊत म्हणाले की, "मोदींच्या नाशिक दौऱ्यात काळाराम मंदिरातील दर्शनाचा उल्लेख नव्हता. त्यांचा रोड शो आणि इतर काही त्यांची योजना होती. पण काळाराम मंदिरात जाऊन पूजा-आरती हा अचानक कार्यक्रम ठरवण्यात आलाय. कारण 22 तारखेला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात जाण्याचं निश्चित केलंय. आम्ही तिथं जाणार म्हटल्यावर महाराष्ट्रातील भाजपाला काळाराम मंदिराची आठवण झाली. मग त्यांनी पंतप्रधान मोदींना काळाराम मंदिर दर्शनाचा कार्यक्रम घ्यायला लावून, आम्ही कशी शिवसेनेवर कुरघोडी केली हे त्यांना दाखवायचं आहे. पण मी म्हणतो राम काय कुरघोडी करण्याचं साधन आहे का?"
मोदी मणिपुरात जाणार का : पुढं बोलताना राऊत म्हणाले, "आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यावर तिथं पंतप्रधान जाणार आहेत. आम्ही यानंतर मणिपुरातील राम मंदिरात जाणार आहोत. पण पंतप्रधान मणिपूरच्या राम मंदिरामध्ये जाणार का? मणिपूरमध्ये इतका मोठा हिंसाचार उसळलेला असताना आणि हजारो लोकांची हत्या झाली असताना, मोदी अजूनपर्यंत मणिपुरात गेले नाहीत. मग ठीक आहे, जर शिवसेना मणिपुरात जाणार असेल तर पंतप्रधान मोदी पण तिकडे येणार का?"
हेही वाचा :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर; आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संत-महंत मोंदींना करणार 'ही' मोठी विनंती
- पंतप्रधान मोदींकडून काळाराम मंदिरात दर्शन, टाळ वाजवित केलं भजन
- पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचं दर्शन, गोदा आरतीही करणार; आयुष्मान हेल्थ कार्डचंही करणार वितरण