मुंबई : भारतीय राजकारणात 18 जुलै हा दिवशी विरोधी पक्षांच्या एकजुटीने इतिहास रचला आहे. मंगळवारी बंगळुरू येथे 26 विरोधी पक्षांनी एकत्र येत आघाडी केली. या आघाडीला 'INDIA' असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे 2004 मध्ये स्थापन झालेल्या यूपीएचे राजकीय अस्तित्व आता संपुष्टात आले आहे. आता यूपीए ही भूतकाळातील गोष्ट झाली असून इंडिया ही नवी इनिंग मानली जात आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे नेते उपस्थित होते. इंडियाची पुढील बैठक लवकरच मुंबईत होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
आघाडीला इंडिया नाव दिल्याने टीका :विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया असे नाव दिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. या टीकेला आता खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार पलटवार केला. सव्वीस पक्षांची जी बैठक झाली. ते 26 पक्ष या देशाच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाचे पक्ष आहेत. एनडीएमध्ये 38 पक्ष सामील झाले होते, पण 9 वर्ष त्यांना आठवण झाली नाही. आम्ही जमतो म्हटल्यावर मोदींना एनडीएची आठवण झाली. आपले मित्र पक्ष आठवले नव्हते. आपले सहकारी पक्ष आठवले नव्हते. मोदी शाहांच्या गटाला आता एनडीए आठवले. वारंवार मोदींनी आपल्या भाषणात आम्ही म्हणजे इंडिया असे म्हटल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
हुकुमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही :पंतप्रधान मोदी म्हणजे इंडिया नाही. भाजप म्हणजे इंडिया नाही. या देशातील प्रत्येक व्यक्ती इंडिया आहे. आम्ही एकत्र आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला भ्रष्टाचारी संबोधले. पण, तुमच्या बाजूला सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा उभा होता. सगळे भ्रष्टाचारी सोबत घेऊन तुम्ही आमच्याबरोबर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहात, हे जरा बंद करा. आम्ही म्हणजे इंडिया स्वतःला मनात नाही, या देशाचा प्रत्येक नागरिक इंडिया आहे. आम्ही 26 पक्ष एकत्र आल्यानंतर तुमचे कमळाचे फुल फुलायला लागले तोपर्यंत आठवण नव्हती. हा इंडिया तुमच्या हुकुमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. इंडिया जिंकणार, भारत जिंकणार हुकूमशाहीचा पराभव होणार हा आमचा नारा आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.