मुंबई-आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी तीन आत्महत्या झाल्यानं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला. चौथी आत्महत्या झाल्यास मराठा समाजानं सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईत आपल्या निवासस्थानी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले की, सरकारला आरक्षण द्यायचे आहे की नाही? हे स्वतःला मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. आज तिसरी आत्महत्या झाली. परवा 24 तारखेला जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपत आहे. तीन आत्महत्या झाल्या तरी सरकारच्या डोळ्यांची पापणीदेखील हलत नाही. मराठा मतांसाठी भारतीय जनता पक्षानं मराठ्यांचा चेहरा म्हणून तुम्हाला बसवलं आहे ना? सरकार फक्त जाहिराती करत आहेत. आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ, यासाठी तुम्हाला बसवलं नाही.
आम्हाला काही सर्टिफिकेट नको-संजय राऊत-पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, तुमच्या सरकारमधील काही लोक हे वेगळ्या दिशेने चालले आहेत. त्यामुळे या राज्यामध्ये दिवाळीच्या आधी वातावरण बिघडू शकत नाही. तुमच्या सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हुलकावण्या देत आहेत. लोकांना भडकावत आहेत. शिंदे गटातील काही स्वतःला मराठा समजणारे काही 96 कुळी नेते आहेत. ते लोकांना भडकवत आहेत. आम्ही कुणबी नाही. आम्हाला काही सर्टिफिकेट नको, अशी विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सरकारमधील नेते मंत्री करत आहेत.