मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर महायुतीतील शिंदे गटात अस्वस्थता पसरलीय. महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर महायुतीतील नेते गप्प आहेत. असं असलं तरी महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय.
जिंकेल त्याची जागा -महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भातलं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिलं. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी जागा वाटपावरून कोणतेही मतभेद न करता तडजोड करत जिंकेल त्याची जागा, अशा प्रकारचा फॉर्म्युला ठरवल्याचं खासदार राऊत यांनी सांगितलयं. तसंच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका 'महाविकास आघाडी' म्हणून एकत्र लढून जिंकणार आहोत. कोणीही जागा वाटपासंदर्भात हट्ट धरणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
घाबरून निवडणूक रद्द -राज्यात निवडणुका न घेता सत्ता गाजवण्याचा प्रकार सुरू आहे. महाराष्ट्रात आमची सत्ता नसताना देखील इंडियाच्या आघाडीची बैठक होणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोट निवडणूका घेतल्या जात नाहीत. तसंच राज्यातल्या महानगरपालिकांमध्ये महापौर नसताना कामकाज सुरु आहे. निवडणुकांना घाबरून निवडणुका न घेण्याचं डरपोकपणाचं लक्षण असल्याचं म्हणत खासदार राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. 'सिनेट' निवडणुकीत 'युवासेने'ला घाबरून निवडणुका रद्द केल्याचा आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केला. मुंबईतल्या शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये 'युवासेने'च्या बाजूने कौल दिला असता. याच भीतीपोटी निवडणुका रद्द केल्याचा दावा खासदार राऊत यांनी केलायं.