मुंबई -राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून अकरा दिवस उलटले असले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यात सरकार कोणाचे येणार याविषयी महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता लागली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका जाहीर केली आहे. जो प्रस्ताव निवडणुकीपूर्वी ठरला आहे. तोच कायम असून भाजपकडून कोणताही नवा प्रस्ताव आलेला नाही आणि शिवेसनाही कोणताही नवीन प्रस्ताव देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीपूर्वी जे ठरले होते. तेच आता व्हायला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाबाबतीत निवडणुकीच्या आधीच सहमती झाली होती. ज्यावेळी महायुती झाली होती, त्याच वेळेस सगळं ठरलं होतं. त्यामुळे आता कुठलेही प्रस्ताव आले तर त्याला काहीही किंमत नसल्याचं संजय राऊत म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत अडीच वर्ष मुख्यमंत्री होणार असल्याचा प्रस्ताव आल्यासंबधीत प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, भविष्यात बघू, असे उत्तर संजय राऊत यांनी दिले.