मुंबई Sanjay Raut On Devendra Fadanvis :येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला आणि उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयातून पळून गेलेला कुख्यात अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला अमली पदार्थ निर्मिती आणि तस्करीच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून अटक केली आहे. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की,'आता ललित पाटील पकडला गेला आहे. यातून आता अनेकांचे संबंध समोर येणार आहेत. अनेकांची तोंडे बंद होणार आहेत.' दरम्यान, यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत :संजय राऊत यांनी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की, सोलापूर, नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणी आत्तापर्यंत 700 ते 800 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलावं. ललित पाटील हा एक मोहरा आहे. त्याच्या नावाचा गैरवापर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री राजकरणासाठी करताय. शुक्रवारी ड्रग्जच्या विरोधात शिवसेनेचा (ठाकरे गट) नाशिकमध्ये मोर्चा आहे. या मोर्चात विविध सामाजिक संघटना, शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात येणारे ड्रग्ज हे गुजरातमधून येतोय. हे देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे का? असा खोचक सवाल राऊतांनी केला.
उपमुख्यमंत्री आहात तर त्यासारखं वागा :पुढं ते म्हणाले की, जे ड्रग्ज पकडलं गेलं नाही. ते महाराष्ट्रात पाठवून महाराष्ट्राला उडता पंजाब करून नशेच्या आहारी टाकण्याचं काम केलं जातंय. हे फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी खुशाल याचं राजकारण करत राहावं. महाराष्ट्राला खड्ड्यात जाताना पहावं. माझी हात जोडून त्यांना विनंती आहे की, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तर त्यासारखं वागा आणि बोला. तसंच नाना पटोले यांनी दोन कॅबिनेट मंत्र्यांची नावं सांगितली होती. या दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे. त्यावर चौकशी नेमावी. मिस्टर फडणवीस ज्यांच्यावर आरोप आहेत हिम्मत असेल तर त्यांना अटक करून दाखवा, असं ओपन चॅलेंज राऊतांनी फडणवीसांना केलं.