मुंबई Shivsena Thackeray vs Shinde : काही दिवसांपूर्वी ठाण्यातील मुंब्रा परिसरात शिंदे गटाने मुंब्य्रातील शंकर मंदिर संकुलात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना शाखा काबीज केली. त्यानंतर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. शिंदे गटाचे नेते राजन किणे हे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी करत पोहोचले. त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते विजय कदम यांच्यासह शाखेत उपस्थित कार्यकर्त्यांना हाकलून लावत तेथील शाखा ताब्यात घेतली. त्यानंतर या शाखेवर बुलडोजर चालवण्यात आला. या शाखेला उध्दव ठाकरेंसह आम्ही सर्व भेट देणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सांगितलंय. ते आज मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.
हिंम्मत असेल तर समोर या : मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंब्रा भागात शिवसेनेची शाखा तोडली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारचं स्ट्रक्चर उभं आहे. हे सरकार बेकायदेशीरपणे चालत आहे. खरंतर या सरकारवर बुडोझर चालवण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेच्या शाखेवर बुलडोजर फिरवतात. यांना लाज वाटत नाही का? या सर्व बाळासाहेबांच्या शाखा आहेत. याठिकाणी आजही निष्ठावंत शिवसैनिक बसतात. मुख्यमंत्री जम्मू काश्मीरला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करत आहेत. मात्र तुमच्या मुंब्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, बाळासाहेबांचे पुतळे असलेल्या शाखांवर बुलडोझर फिरवत आहे. महाराष्ट्रात ही मोगलाई सुरू आहे का? तुम्ही शाखा तोडत आहात. तुमच्यात हिम्मत असेल तर समोर या. हे सर्व ठाण्यातच सुरू आहे, इतर ठिकाणी नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर टीका केलीय.