महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष: संजय राऊतांचा आता दुसरा बॉम्ब , शरद पवारानंतर उद्धव ठाकरेंची तडाखेबंद मुलाखत - संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत

महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि त्यांना यात साथ देणारे त्यांचे शिवसेनेतील विश्वासू संजय राऊत यांनी एका वादळी मुलाखतीचा 'बॉम्ब' टाकल्यानंतर आता संजय राऊत दुसरा बॉम्ब टाकणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दणकेबाज मुलाखत लवकरच प्रसारित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sanjay Raut new interview with Uddhav Thackeray will be released soon
शरद पवारानंतर उद्धव ठाकरेंची तडाखेबंद मुलाखत

By

Published : Jul 15, 2020, 8:53 PM IST

Updated : Jul 16, 2020, 6:44 AM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या रूपाने अभूतपूर्व असं 'सत्ताकारण' पाहायला मिळालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पूर्णपणे भिन्न विचारसरणीच्या पक्षांसोबत शिवसेनेने आघाडी करत भाजप या आपल्या जुन्या मित्राला शह दिला. ही राजकीय उलथापालथ ज्यांनी घडवली ते महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि त्यांना यात साथ देणारे त्यांचे शिवसेनेतील विश्वासू संजय राऊत यांनी एका वादळी मुलाखतीचा 'बॉम्ब' टाकल्यानंतर आता संजय राऊत दुसरा बॉम्ब टाकणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दणकेबाज मुलाखत लवकरच प्रसारित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवारांप्रमाणेच या मुलाखतीचे चित्रीकरण मुंबई उपनगरातील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. संजय राऊत हे ट्विटच्या माध्यमातून याबाबत लवकरच घोषणा करणार आहेत. शिवसेनेचे मुखपत्र ' सामना 'चे कार्यकारी संपादक असलेल्या खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. पवार यांच्याही मुलाखतीने देशाच्या राजकारणात खळबळ उडवली होती. राऊत यांनी मुलाखतीच्या तीन टप्प्यातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक विषयांना वाचा फोडली होती. आज शरद पवार यांच्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग प्रसारित झाल्यानंतर सर्वांचीच उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीसाठी उत्सुकता वाढवली आहे. मुलाखतीच्या तीन भागांमध्ये शरद पवार यांच्याशी दिलखुलास गप्पांमधून चीनपासून महाराष्ट्रातील घडामोडींपर्यंत शरद पवार जोरदार बोलले. एकंदरच राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची ही मुलाखत सद्यस्थितीत अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली आहे.

संजय राऊतांचा आता दुसरा बॉम्ब , शरद पवारानंतर उद्धव ठाकरेंची तडाखेबंद मुलाखत


सामनाचे कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात वादळ उभे करत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संजय राऊत यांनी हा पॅटर्न शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबाबत कायम ठेवला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली ही पहिलीच मुलाखत ठरणार आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्षनेते असलेल्या भाजप पक्षनेत्यांवर कशा पद्धतीने तोफ डागली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे केंद्रीय नेतृत्वाबद्दलचे मतही या मुलाखतीमध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत आहे. त्यातील चार महिने कोरोनाशी लढण्यात ठाकरे सरकारची शक्ती गेली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनच भाजप नेते सातत्याने राज्य सरकारवर टीका करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यामध्ये आणलेला अडथळा, त्यानंतर राज्यात धोरणाचे अपयश सांगून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी, कोरोना रुग्णांचे दडवलेले कथीत मृत्यू आणि प्रशासनाचा राज्यस्तरावर कारभार यावरही उद्धव ठाकरे सडेतोड बोलणार आहेत.

संजय राऊतांचा आता दुसरा बॉम्ब , शरद पवारानंतर उद्धव ठाकरेंची तडाखेबंद मुलाखत


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे सरकार पुढील पाच वर्ष स्थिर राहील असा निर्वाळा दिला आहे. असे असताना उद्धव ठाकरे 3 पक्षाच्या महाविकास आघाडीबाबत पुढची दिशा या मुलाखतीच्या माध्यमातून राज्याला दाखवणार आहेत. कोरोनाच्या कार्यकाळात सर्वच राज्यांना केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. याबाबत अद्याप तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्र सरकारवर कठोर टीका केलेली नाही. या मुलाखतीमध्ये हाच पॅटर्न कायम ठेवत केंद्र सरकारवर सौम्य टीका करत
राज्य सरकारच्या पारदर्शक कारभाराची कुंडली मॅरेथॉन मुलाखतीतून उद्धव ठाकरे मांडणार असल्याची खात्रीलायक माहिती 'ईटीव्ही' भारतला मिळाली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याचा दौरा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानावरूनच राज्याचे मॅरेथॉन आढावा बैठकांमध्ये गुंतून घेतले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी झोपडपट्टी कोरोनामुक्त झाल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) घेतली आहे. एकंदरीतच कोरोनाचे संकट आणि राज्यापुढील आव्हाने, शिवसेना पक्षाची पुढील वाटचाल यावर सडेतोड मुलाखतीकडे राज्यातील आणि देशातील जनतेचे लक्ष लागले आहे हे मात्र नक्की...

Last Updated : Jul 16, 2020, 6:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details