मुंबई: शिवसेनेतील बंडानंतर महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली. याच दिवसाची आठवण म्हणून ठाकरे गटाकडून आज खोके दिन म्हणून साजरा केला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहित आज जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा, असे पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी ट्विट केले आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाकडून स्वाभिमान दिन साजरा केला जाणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून आज गद्दार दिन साजरा केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांच्या सुरत गोवा व्हाया गुवाहाटी दौऱ्याला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्यसभेचे मतदान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी सुरत मार्गे गुवाहातीला पलायन केले. त्यानंतर जे काही झाले ते आपल्या सर्वांसमोर आहे. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या या ऐतिहासिक बंडखोरीला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युनायटेड नेशनला पत्र लिहिले आहे. यात त्यांनी 20 जून हा आंतरराष्ट्रीय गद्दार दिवस साजरा करण्याची मागणी केली आहे.
गद्दारांना जोडे मारले पाहिजेत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंद व इतर विषयांसंदर्भात खासदार संजय राऊत यांनी आपल्या निवास्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, आता योगा डे साजरा केला जाईल. यासह अनेक दिवस साजरे करण्यासंदर्भात युनायटेड नेशन निर्णय घेत असते. या जगामध्ये युनायटेड नेशनच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे दिवस साजरे केले जातात. 20 जून हा देशातल्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस आहे. आईसारख्या शिवसेनेच्या पोटात खंजीर खुपसून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाळीस आमदारांनी ज्या प्रकारची बेईमानी केली. त्यावरून एकतर या दिवशी गद्दारांना जोडे मारले पाहिजेत.
नुसते डोळे वटारले ईडीने आणि शिंदे पळून गेले-पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंतराष्ट्रिय योगा डेसाठी प्रयत्न केले होते. पंतप्रधानांनी या जागतिक गद्दार दिनासाठी देखील प्रयत्न करावे, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सरकारने SIT ची स्थापना केली आहे. या विशेष पथकाने आपले काम सुरू केले असून पालिकेच्या विविध अधिकारी व माजी नगरसेवकांना नोटिसा पाठवल्या आहेत. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना नुसते डोळे वटारले ईडीने आणि ते पळून गेले. कुठल्या नोटीसची गोष्ट करताय? त्यांच्या माणसाला कोण उचलून घेऊन गेले हे बघा आधी. आम्हाला नोटीस आले आम्ही बेडरपणे तुरुंगात गेलो. आम्ही गद्दारी केली नाही. आम्ही सर्व काही भोगले. आम्ही तुरुंगवास भोगला. संघर्ष केला. तुमच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे आहोत का? सचिन जोशी यांना का उचलले, हे आधी ईडीला विचारा?" असा सवाल देखील राऊत यांनी विचारला आहे.