मुंबई - काही लोक पक्ष सोडून गेली आहेत. मात्र, पक्ष हा जागेवरच आहे. ती लोक गेली म्हणजे पक्ष गेला असा होत नाही असा टोला खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना लगावला आहे. आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी शिवसेना भवनामध्ये बैठक बोलावली होती. बैठकीनंतर प्रसार माध्यमाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हा टोला लगावला आहे. तसेच राज्यभरातून शिवसैनिक आणि पदाधिकारी पक्षध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. आजही अनेक शिवसैनिक आणि नेतेमंडळी यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून आपण पक्षासोबतच असल्याचा विश्वास दिला असल्याचे संजय राऊत यांनी सागितले आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांसोबत बंडखोरी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली खेचले आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेकडे लक्ष देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली होती. शिवसेना भवनात पार पडलेल्या या बैठकीत खासदार संजय राऊत माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीतून राज्यांमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी कामाला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मराठवाड्यात बंडखोरांच्या विरोधात मतप्रवाह - या बैठकीत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील उपस्थित होते. शिवसेनेच्या बंडोकर आमदारांमध्ये मराठवाड्यातील 5 आमदार सहभागी आहे. संपूर्ण मराठवाड्यात या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने काममध्ये मतप्रवाह आहे. हे बंडखोर आमदार मतदार संघात परतल्यानंतरही या आमदारांसोबत शिवसैनिक जाणार नाहीत, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.