मुंबई :Sanjay Raut :जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलंय. विरोधी पक्षाचे नेते आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. शनिवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनात प्रस्ताव आणावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करता येत नाही का : 'सर्वोच्च न्यायालयानं लोकायुक्तांच्या अधिकाराबाबत दिल्ली सरकारच्या बाजूने निर्णय दिला. तो निर्णय फिरवण्यासाठी संसदेत घटनात्मक दुरुस्ती करण्यात आली. नवीन विधेयक मांडून कायदा केला गेला. केंद्र सरकारच्या हातातून अधिकार जात होते. त्यामुळे त्यांनी एवढं सर्व केलं. मग आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही घटनादुरुस्ती करता येत नाही का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
संसदेच्या विशेष सत्रात चर्चा व्हायला हवी : 'तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, लोकनियुक्त सरकारचा आवाज दाबण्यासाठी संसदेत विशेष विधेयक आणता. जबरदस्तीनं ते मंजूर करून घेता. आता तुम्ही संसदेचं विशेष सत्र बोलावलं आहे. या सत्रात मराठा आरक्षणा संदर्भात काही घटनादुरुस्ती करून मराठा आणि ओबीसी समाजात जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत, त्यांना न्याय देता येईल का? यावर चर्चा व्हायला हवी', असं संजय राऊत म्हणाले.