मुंबई :उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांना गोळ्या घालण्याची धमकी मिळाली आहे. संजय राऊत यांचे आमदार भाऊ सुनील राऊत यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला, ज्याने संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली. हे संभाषण जोरदार व्हायरल होत आहे. या संभाषणामध्ये ती व्यक्ती संजय राऊत यांना पत्रकार परिषद थांबवण्यास सांगत आहे आणि सहमत नसल्यास गोळ्या घालण्याची धमकी देत आहे. यासोबतच संभाषणात दोन्ही बाजूंनी शिवीगाळही करण्यात आली आहे.
जीवे मारण्याची धमकी :आज सकाळीच शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे समोर आले होते, त्यानंतर आता या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अगोदर देखील संजय राऊत यांना अनेकदा धमकीचे फोन आलेले आहेत. शरद पवार यांना 'राजकारण महाराष्ट्राचं' नावाच्या ट्विटर अकाऊंटवर ही धमकी दिली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या अगोदर 2022 मध्ये देखील शरद पवार यांना असाच धमकीचा फोन आला होता.