महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut in Kolhapur : सहा महिन्यात सरकारने 18 चोरांना क्लीनचीट दिली; संजय राऊतांचे वादग्रस्त विधान - संजय राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंची शिवसेना आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या सहा महिन्यात सरकारने 18 चोरांना ओडब्ल्यूच्या माध्यमातून क्लीन चीट देण्याचा प्रकार राबवला आहे, असे राऊत म्हणाले आहेत. ते कोल्हापूरात बोलत होते. ते शिवगर्जना अभियानासाठी राज्यभर दौरा करत आहेत.

Sanjay Raut Critics
संजय राऊत

By

Published : Mar 1, 2023, 4:35 PM IST


खासदार संजय राऊत माध्यमांसोबत संवाद साधताना

कोल्हापूर: खासदार संजय राऊत हे शिवगर्जना अभियानासाठी राज्यभर दौरा करत आहेत. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडत आहे. यावेळी त्यांनी कोल्हापूरात पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही. आमच्या सोबत जे आहेत ते म्हणजे शिवसेना आहे असे राऊत यांनी म्हंटले आहे. शिवाय त्यांची विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच गेल्या सहा महिन्यात सरकारने 18 चोरांना ओडब्ल्यूच्या माध्यमातून क्लीन चीट देण्याचा प्रकार राबवला आहे.

18 चोरांना क्लिनचिट: खासदार राऊत करत पुढे म्हणाले की, कायदा आणि पोलीस कोणाच्या मर्जीने नाचत असतील तर असे प्रकार होणे अपेक्षित आहे. आम्हाला देखील अटक केली. दिल्लीमध्ये मनीष सिसोदया यांना देखील अटक केली. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी ज्या चोराने म्हणजे किरीट सोमय्याने लाखो रुपये गोळा केले आणि हे लाख रुपये राजभावनात जमा केले. मात्र, हे पैसे कुठे गेले अद्याप देखील समजलेले नाही. अनेकांना सरकारने क्लिन चिट दिली आहे. अशा पद्धतीने गेल्या सहा महिन्यात सरकारने 18 चोरांना ओ डब्ल्यूच्या माध्यमातून क्लीन चीट देण्याचा प्रकार राबवला आहे.

विक्रांत घोटाळा हा का थांबवला?: खासदार राऊत पुढे म्हणाले की, जनतेचा पैसा कुठे गेला? याबाबत मी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अगोदर सोमम्या यांनी हे कोट्यवधी रुपये पैसे कुठे ठेवले आहेत, हे स्पष्ट करावे. उद्धव ठाकरे यांच्या काळात कोविड सेंटर हे उत्तम प्रकारे चालले. तरीही काम करणाऱ्याला त्रास द्यायचा आणि याकरिता केंद्रात इडी-सीबीआय आणि राज्यात ओ डब्ल्यू आणि पोलीस यांचा वापर केला जात आहे. कसबा आणि चिंचवडच्या निवडणुका जेव्हा आम्ही हारतो, हे समजत तेव्हा मुख्यमंत्र्यांनी-उपमुख्यमंत्र्यांनी या यंत्रणाचा वापर केला. हाताशी अशा यंत्रणा घेऊन राज्य करणार असतील, तर हे मोडून काढू. आम्ही तुमच्या अशा कारवायांना घाबरत नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

चार्जशीट दाखल करणार: कोविड काळात अनुभव नसणाऱ्यांना टेंडर देत घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात असून यामध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही हे सर्व खोटे प्रकरण आहे. कोविड काळात सर्वात जास्त मृत्यू हे योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात झाले. त्यानुसार तर सर्वात आधी योगी आदित्यनाथ यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. गुजरातमध्ये स्मशानभूमीमध्ये प्रेतांचे रांगा लागल्या होत्या. यामुळे योगी आदित्यनाथांवर गुन्हा दाखल करावा. हे इतके भंपक खोटारडे लोक आहेत. महाराष्ट्र बुडवण्यासाठी परप्रांतातून येथे आले आहेत. त्यांना महाराष्ट्र लुटून दुसऱ्या राज्यात घेऊन न्यायचे आहे. आणि अशा विरोधात मी लवकरच चार्जशीट दाखल करणार आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

पोटनिवडणूकीत आमचाच विजय: कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकीबाबत एक्झिट पोल बाहेर आले आहेत. कसब्याची जागा महाविकास आघाडीकडे येणार असली तरी चिंचवडची जागा मात्र त्यांच्या हातातून जाण्याचा कल एक्झिट पोल मधून सांगितला जात आहे. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ही चुकीची माहिती असून चिंचवडची जागा महाविकास आघाडीची जागा असून ती आमच्याकडेच राहील. कसब्याचे जागा ही गेली 30-35 वर्ष भाजपकडे आहे. हे भाजपच्या हातातून जाते ही खरी माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ:संसदीय घटनेच्या पदावरून संजय राऊत यांना हटवण्याचे काम शिंदे सरकार करत आहे. यावर खासदार राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, जे बनावट डुप्लिकेट शिवसेना तयार झाली आहे. ज्यामध्ये विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढल्या म्हणून आम्हीच पक्ष सोडणारे नाही, असे अनेक पद बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिली. ती आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो आम्ही लफंगे नाही गेलेली पद पुन्हा येतील मात्र आमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले आहेत.

कणेरी मठातील घटनेवर काय म्हणाले?:कणेरी मठ येथे गाईंच्या मृत्यूबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, घडलेला हा प्रकार अत्यंत चुकीचा झाला आहे. 52 गाईंचा आकस्मित मृत्यूचा प्रकार हा जर दुसऱ्या राज्यात घडला असता तर हिंदू आक्रोश मोर्चा निघाला असता. मुख्यमंत्री आणि अनेक भाजपचे कार्यकर्ते आले त्या गाईंना चारा घातला आणि दुसऱ्या दिवशी गायींचा मृत्यू होतो. रेडा बळीप्रमाणे हा कोणता बळी आहे का हे पहावा लागेल. आम्ही गायींना श्रद्धांजली वाहिली आणि विधिमंडळात देखील या श्रद्धांजली वाहिली जाईल पण या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. पालघरचे साधूंचे हत्याकांड आणि कणेरी मठातील गायींचे हत्याकांड हे एक समान आहेत. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर देखील दबावाखाली असून आकडे लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दबावाचा राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकते, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा: Maharashtra Budget Session 2023 : संजय राऊत अडचणीत.. विधानसभेत हक्कभंगाचा अर्ज, कामकाज तहकूब

ABOUT THE AUTHOR

...view details