मुंबईSanjay raut :आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर घणाघाती टीका केली. आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होत आहे. या सुनावणीआधीच संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. आमच्याकडं आवश्यक असणारा आकडा आहे. त्यामुळं सरकार पडणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे. या विधानाबाबत राऊत यांना विचारलं असता, "आकडा तुम्ही लावू नका, सरकार पाडणं हे तुमचं काम आहे का?" असं राऊत म्हणाले. तसंच "जोपर्यंत तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालचं मांजर बनून खुर्चीवर बसलेत, तोपर्यंत सरकार पडणार नाही", अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली.
स्वार्थासाठी अनेक पक्ष बदले :पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी घटना आणि संविधानानुसार काम केलं पाहिजे. कोर्टानं तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या असे निर्देश दिले आहेत. पण विधानसभा अध्यक्ष हे चालढकल आणि वेळकाढूपणा करताहेत. 'कायद्यानुसार तुम्ही तटस्थ राहून काम केलं पाहिजे. तुम्ही सरकारची वकिली करू शकत नाही', असं कोर्टानं नार्वेकरांना सुनावलं आहे. नार्वेकर हे घटनाबाह्य सरकारला संरक्षण देताहेत. तसंच सोयीनुसार नार्वेकरांनी अनेक पक्ष बदलेत. त्यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा? असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला.