मुंबई : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकीय वातावरण तापलेले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर ताशेरे ओढले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे काल गद्दारांची गाडी चालवत होते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जे लोक मोदींजीची चाटुगिरी करतात त्यांना दिल्लीला बोलवले जाते, असा टोलाही संजय राऊत यांनी नवीन संसद उद्धाटनाच्या आमंत्रणावरुन लागला.
उद्घाटन सोहळा हा फक्त राजकीय इव्हेंट : संजय राऊत म्हणाले आहेत की, देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहेत. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमचा विरोध नाही. त्यांना आमची एवढीच विनंती आहे की, या उद्घाटन सोहळ्यामध्ये देशाच्या राष्ट्रपतीला सामावून घेतले पाहिजे. राष्ट्रपती या महत्त्वाच्या पदावर असून तो त्यांचा अधिकार आहे. देशाच्या घटनेवर, संविधानावर हल्ला होत आहे, याला आमचा विरोध आहे. निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांचे साधे नावदेखील नाही. नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा हा फक्त राजकीय इव्हेंट करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठरवले असेल तर ते चुकीचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले. तसेच प्रधानमंत्री यांनी याप्रकरणी लक्ष घालावे आणि स्वतः राष्ट्रपती भवनात जाऊन द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण द्यावे असेही राऊत म्हणाले.
आमच्या सारख्यांचे काय? : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलावले आहे का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, लोकशाहीवादी आणि देशभक्तांना दिल्लीमध्ये बोलावले जात नाही. जे चाटुगिरी करतात, मोदींचे भजन करतात, त्यांनाच दिल्लीला बोलावले जाते. राष्ट्रपती यांच्या सहीने संसद सुरू होते. त्यांच्या अभिवाचनाने संसद चालते. लोकशाहीच्या भूमिका त्या ठरवतात. संविधानाच्या प्रमुख राष्ट्रपती आहेत. जिथे राष्ट्रपतीलाच बोलावलं नाही. तिथे आमच्यासारख्यांचं काय? पण न बोलता ही पंक्तीमध्ये बसणारे खूप लोक असतात, ते जात असतील,असा टोलाही राऊत यांनी या प्रसंगी लगावला.