मुंबई : रविवारी २८ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. या उद्घाटनावर २० विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. तरीसुद्धा या उद्घाटनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाम असल्याने आता शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आलेली आहे. वास्तविक निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षाचे नाव असायला हवे होते. तसे झाले असते तर लोकशाहीची शोभा सुद्धा वाढली असती. परंतु मोदींच्या खासगी पंगतीत कोणी यायचं नाही, तुम्ही आला तर तुमचा अपमान करू, असा स्पष्ट संदेश सरकारने दिला असल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे.
अडवाणी यांना एखादा कोपरा आहे का : पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील भाजप मुख्यालयाचे दिमाखदार उद्घाटन झाले. त्याचप्रमाणे नव्या संसद भवनाचे उद्घाटन होईल, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. वास्तविक निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षाचे नाव असायला हवे. पण तसे झाले असते तर लोकशाहीची शोभा वाढली असती. परंतु आमच्या खासगी पंगतीत कोणी यायचे नाही. जर आलात तर तुमचा अपमान करू, असा स्पष्ट इशाराच मोदी सरकारने दिला असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. संसदेचे सर्वाधिकारी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना जर या सोहळ्याचे आमंत्रण नसेल तर इतरांचे काय घेऊन बसलात? असा प्रश्नही उपस्थित केला. मिंधे - फडवणीस यांना अशा पंगतीत बसायला नेहमीच आवडते आणि त्यांनी जायलाच हवे असा टोमणा राऊतांनी लगावला आहे. पण त्या प्रसंगी अडवाणी यांना एखादा कोपरा आहे काय? तेवढे तरी पहा, असा प्रेमाचा सल्लाही यातून देण्यात आला आहे.
उद्घाटनाच्या कोनशिळेवर फक्त माझेच नाव? : दिल्लीत रविवारी होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर २० विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहिष्कराची पर्वा न करता फीत कापण्याचे ठरवले आहे. विरोधी पक्षांच्या बहिष्कारावर भाजपचे लोक टीका करत असले तरी सत्य असे आहे की, २० प्रमुख पक्षांचा विरोध नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला नाही. तर उद्घाटनाचे साधे निमंत्रण राष्ट्रपतींना नाही, हा वादाचा मुद्दा आहे. या नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणे हे परंपरेला धरून आहे. पण असे झाले नसल्याने हे नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कोनशिळेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच, असे मोदी यांचे धोरण असल्याने हा अहंकार लोकशाहीला घातक असल्याची राऊत या लेखात म्हणाले आहेत. नवी संसद भवन हे काय एखाद्या पक्षाच्या मालकीची नाही. ते देशाची आहे. नटवरलाल नावाच्या एका भामट्याने संसद भवन, राष्ट्रपती भवन, ताजमहाल, इंडिया गेट हे बनावट कागदपत्रांद्वारे विकल्याची एक दंतकथा प्रसिद्ध आहे. तसेच बनावट कागदपत्रे कोणी मालकीचे करून घेतले आहेत काय? असा प्रश्नही त्यांनी या लेखात उपस्थित केला आहे.