मुंबई : आळंदी येथे रविवारी पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले आहे. या मुद्द्यावर आता विरोधक आक्रमक झाले असून शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. एकनाथ शिंदे सरकारमधील काही मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.
धर्माभिमानी मुख्यमंत्री कुठे आहेत : संजय राऊत म्हणाले की, काल पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला होता. काही बोगस आचार्य प्राचार्य काल तिथे बसले होते. त्यातून पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. पंढरीची वारी महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्या वारीवर आतापर्यंत कधी संकट आले नव्हते. आता हेच लोक विठोबाची पूजा करायला बसतील. रविवारी वारकरी जखमी झाले, पळापळ झाली, ही सत्तेची मस्ती आहे. भाजप मस्ती दाखवायला जाते. प्रत्येक ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण करायचा, यासाठी काही टोळ्या आहेत. त्या काम करतात, धर्माभिमानी मुख्यमंत्री कुठे आहेत, फडणवीस कुठे आहेत, असा सवालही राऊत यांनी केला. हिंदू आक्रोश मोर्चा काढणार कुठे आहेत, आता काढा मोर्चा, भाजपची टोळी यामागे आहे. मागच्या वर्षीचे बोलू नका, यावर्षीचे बोला, यावर्षी तुम्ही आहात ना गृहमंत्री मग का झाले असे? असेही त्यांनी यावेळी विचारवले. भाजपने या गोष्टीचा धिक्कार केला नाही, मिंधे गट कुठे आहे, गुन्हा दाखल ते करणार नाहीत, पोलिसांच्या बडतर्फिची मागणी केली आहे. निदान माफी तर मागा, नाही तर तुम्हाला अजिबात अधिकार नाही आषाढीला पूजा करण्याचा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंढरीची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती :आळंदी येथे पहिल्यांदा वारकऱ्यांवर लाठीमार झाला, त्याचा निषेध धिक्कार करतो. काल औरंगजेब अवलाद कशी पैदा झाली ते आम्ही बघितले. बेदम मारताना वारकऱ्यांचे चित्र दिसत होते. त्यामुळे ते पुढे नाकारू शकत नाही. पंढरीची वारी ही दरवर्षी निघते व हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता आहे. त्यांचा नियोजन संयम शांतता शिस्त अशी वारी असते. या वारीवर सरकारच्या माध्यमातून असे संकट कधी आले नव्हते. वारकऱ्यांची सरकारला माफी मागायला पाहिजे. महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे. ही सत्तेची मस्ती आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपली राजकीय मस्ती दाखवायला जातो. प्रत्येक ठिकाणी धार्मिक बखडा निर्माण करायचा आणि वातावरण तापवायचे हेच यांचे काम आहे. काल इतिहासातला अत्यंत लाजिरवाणा प्रकार महाराष्ट्रातला झाला आहे.
मंत्र्यांची होणार गच्छंती : संजय राऊत पुढे म्हणाले की, शिंदे गटातील चार मंत्र्यांना काढा ते भ्रष्ट आहेत, अकार्यक्षम आहेत, त्यांच्याविषयी उपापोह आहे. त्या चार मंत्र्यांची नावे मला माहित आहेत. चार मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासाठी भाजपच्या हायकमांडने दबाव आणला आहे. यांना काढा, दोन पक्ष वेगळे आहेत ना, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेना आहे. पण दबाव आहे, मी स्वतः हे सांगितले. मला या सगळ्या हालचाली माहित आहेत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
हेही वाचा -
- Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस इतिहासातील सर्वात कमजोर गृहमंत्री- संजय राऊत
- Nitesh Rane criticizes Sanjay Raut: संजय राऊत क्रांतिवीर नाही, त्यांनी मराठी लोकांची घरे लुटली- नितेश राणेंची टीका