मुंबई : राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असे म्हटले जाते. असाच काहीसा प्रकार मंगळवारी पुण्यात पहायला मिळाला. येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मंच शेअर केला. यावेळी पवारांनी मोदींच्या पाठीवर थाप मारली, तर दोन्ही नेते एकत्र हसतानाही दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवार यांच्याशी हस्तांदोलन केले. पुतणे अजित पवार यांनी साथ सोडल्यानंतर महिनाभरातच हे दृश्य पाहायला मिळाले. शरद पवारांचा पक्ष फुटल्यानंतर मोदी आणि पवार यांची ही पहिलीच भेट होती.
शरद पवारांची उपहासात्मक टिप्पणी : शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान मोदींची विनम्रपणे भेट घेतली, पण ते वेळीच कटाक्ष टाकण्यास चुकले नाहीत. 'शिवाजी महाराजांनी कधीही कोणाची जमीन हिसकावली नाही', असे शरद पवार म्हणाले. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कथित फूट पाडल्याबद्दल पवारांनी ही उपहासात्मक टिप्पणी केली, अशी चर्चा आता होते आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल मी मोदींचे अभिनंदन करतो, असे पवार म्हणाले. पवार यांनी आपल्या भाषणात पुण्याचा इतिहास आणि महत्त्व तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि टिळकांच्या योगदानावर प्रकाश टाकला. भारतातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला, असे शरद पवार म्हणाले.
विरोधी पक्षांची विनंती धुडकावली : कार्यक्रमापूर्वी शरद पवारांनी मोदींसोबत स्टेज शेअर करू नये, अशी विनंती विरोधी पक्षांनी केली होती. भाजपच्या विरोधात संयुक्त आघाडी तयार होत असताना पवारांनी मोदींसोबत स्टेज शेअर करण्याने चांगला संदेश जाणार नाही, असे 'इंडिया' आघाडीच्या सदस्यांचे मत होते. कार्यक्रमाच्या एक दिवस आधी, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते शरद पवार यांच्यासोबत मंच शेअर करण्यास का तयार आहेत हे भाजपने स्पष्ट करणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनी महिनाभरापूर्वी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. तर, अजित पवार गटाच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भाजपची बाजू घेतली. यावर भाजपकडून स्पष्टता यायला हवी, असे संजय राऊत म्हणाले.