मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला दुसरा उमेदवारही रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. काँग्रेसने दुसरा उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. राज्याची स्थिती गंभीर असताना कोणी राजकारण करू नये, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भूमिका आहे. पण काँग्रेस आपला दुसरा उमेदवार मागे घेण्यासाठी तयार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणे धूसर झाले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय बैठकांचे फड रंगात आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली आहे. तर पवार यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांशीही संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. घटनात्मक पेच टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळातीळ विधान परिषदेचे सदस्यत्व मिळवून देण्यासाठी, कोरोनाचा प्रादुर्भाव असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले. मात्र, आता सहाव्या जागेवरून आघाडीत बिघाडी निर्माण होत आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही संतप्त झाले असल्याचे शिवसेनेच्या गोटात चर्चीले जात आहे.