महाराष्ट्र

maharashtra

संजय राऊत आणि अनिल देशमुखांची यंदाची दिवाळी आर्थर रोड कारागृहातच

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत काल शुक्रवार (दि. 21 ऑक्टोबर)रोजी पीएमएलए न्यायालयाने कोठडीत वाढ केली आहे. राऊत यांना २ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

By

Published : Oct 22, 2022, 7:32 PM IST

Published : Oct 22, 2022, 7:32 PM IST

राऊत vs देशमुख
राऊत vs देशमुख

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कथित १०० कोटी वसूली प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाला असला तरी मात्र सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन देण्यास पीएमएलए न्यायालयाने नकार दिला. या दोघांच्या याचिकांवर काल पीएमएलए न्यायालयाने निकाल देत अनिल देशमुख आणि संजय राऊत यांची यंदाची दिवाळी पहिल्यांदाच आर्थर रोड तुरुंगातच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांच्याही कुटुंबीयांची कुटुंब प्रमुख असलेल्या संजय राऊत आणि अनिल देशमुख यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी घरी असावे यासाठी त्यांना जामीन मिळावा अशी आशा होती. मात्र, या आशेची काल कोर्टाने दिलेल्या निकालामुळे निराशा झाली आहे.

कथित १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख सध्या आर्थर तुरुंगात आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वीच ईडीच्या गुन्हांमध्ये जामीन मिळाला होता. मात्र, सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरू होती. काल सीबीआय न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. देशमुख यांच्यावरील गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. देशाच्या अर्थ व्यवस्थेवर परिणाम करणारा आहे. देशमुख यांना कारागृहात योग्य ते वैद्यकीय उपचार मिळत आहेत. शिवाय प्रकरणातीत माफीचा साक्षीदार झालेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या जबाबाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांचा जबाब महत्त्वाचा आहे, असे विशेष सीबीआय न्यायालयाने देशमुख यांना जामीन नाकारताना नमूद केले.

अनिल देशमुखांवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सध्या अटकेत असलेले बडतर्फ पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेही या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. तर पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दणका दिला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दसऱ्यापाठोपाठ संजय राऊत यांची दिवाळीही तुरुंगातच जाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

गोरेगाव येथील कथित पत्राचाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांनी जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर काल २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत २ नोव्हेंबरला ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊतांना आजही दिलासा मिळाला नाही.

पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने 1 ऑगस्टला अटक केलेल्या संजय राऊतला आता आर्थर रोड तुरुंगात अंडरट्रायल क्रमांक 8959 म्हणून ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राऊत यांना एका स्वतंत्र बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे. कारागृह प्रशासनाकडून त्यांच्या मागणीनुसार त्यांना वही आणि पेन देण्यात आले आहे. ते तुरुंगातील ग्रंथालयातून वाचनासाठी पुस्तके घेतात. त्यांनी तुरुंगात एखादे पुस्तक लिहिले तरी त्यांचे लिखित काम तुरुंगाच्या हद्दीतच राहील आणि बाहेर जाऊ शकत नाही. मुंबई न्यायालयाने परवानगी दिल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कारागृहात घरचे जेवणही मिळत आहे. 8 ऑगस्ट रोजी राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत.

दाऊद इब्राहिमच्या साथीदारांशी संबंध असलेल्या प्रॉपर्टी डील प्रकरणात नवाब मलिकला अटक करण्यात आली आहे. ईडीने गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या साथीदारांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली 23 फेब्रुवारीला अटक केलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे आर्थर रोड जेलमधील कैदी क्रमांक 4622 आहेत. ईडीने अटक केल्यापासून मलिक यांना कोठडीत ठेवण्यात आले होते, परंतु त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सध्या कुर्ला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने मलिक यांना आर्थर रोड कारागृहातील बेड आणि खुर्ची वापरण्याची परवानगी दिली होती आणि घरचे अन्न खाण्याची परवानगी दिली होती. त्यांनाही वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले असून टीव्ही, कॅरम, पुस्तके यांसारख्या वस्तू देण्यात आल्या आहेत.

अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक : उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील आर्थर रोड तुरुंगात कैदी क्रमांक २२२५ आहेत. देशमुख गेल्या ९ महिन्यांपासून आर्थर रोड कारागृहात आहेत. देशमुख यांना 1 नोव्हेंबर 2021ला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचा लेटरबॉम्ब फोडल्यानंतर आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी अटक केली होती. मात्र, देशमुख यांना न्यायालयाने घरच्या जेवणाची परवानगी न दिल्याने त्यांना तुरुंगात दिलेले जेवण खावे लागत आहे. मात्र, त्यांना त्यांच्या स्वतंत्र बॅरेकमध्ये बेड, कॅरम आणि टीव्ही देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details