मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी राज्यात स्थापण करीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ दिली. मात्र, आता येत्या 28 फेब्रुवारीला संजय बर्वे यांचा कार्यकाळ संपत असून महाविकास आघाडी आता मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाला पसंती देतेय हे पाहण्यासारखे आहे.
कोण होणार मुंबई पोलीस आयुक्त, परमबीर सिंग की संजय पांडे? - महाविकास आघाडी
देशात कुठल्याही पोलीस आयुक्तपदाला जेवढा सन्मान नसेल तेवढे मुंबई पोलीस आयुक्त पद हे मानाचे मानले जाते. प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्याला त्याच्या कारकिर्दीत या पदावर काम करायला मिळावे म्हणून आशा असतेच.
संजय पांडे
संजय पांडे हे १९८६ बॅचचे आयपीएस अधिकारी असून आयआयटीत त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलय... शिवाय सेवा ज्येष्ठतेनुसार संजय पांडे हेच मुंबई पोलीस आयुक्त पदाकरता अग्रस्थानी आहेत. याआधीच्या सर्व सरकारांनी संजय पांडे यांना नेहमी डावललं आहे .मात्र, न्यायालयीन लढा लढत संजय पांडे यांनी सर्व महत्वाची पदे भुषवलीयेत. पण याही सरकारशी संजय पांडे यांचे जवळचे संबंध नसल्याने संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त पदी विराजमान होतील असं दिसत नसल्याची चर्चा आहे.
परमबीर सिंग?
१९८७ बॅचचे आयपीएस आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट, गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या सरकारमधील नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केल्याने परमबीर सिंग यांची वर्णी मुंबई पोलीस आयुक्त पदी लागण्याची शक्यता सर्वात जास्त आहे...
रश्मी शुक्ला?
पुणे पोलीस आयुक्तपदीचा कार्यभार तसच विविध मोठी पदे भुषवलेल्या रश्मी शुक्ला या एकमेव महिला अधिकारी मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या रेसमध्ये आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदी पहिली महिला आयपीस म्हणून यांची वर्णी लागण्याची जास्त शक्यता होती. मात्र, महाराष्ट्र बॅंक प्रकरणामुळे रश्मी शुक्ला यांनी राज्यातील सरकारची नव्हे तर केंद्र सरकारची देखील नाराजी ओढावून घेतली होती. शिवाय रश्मी शुक्ला यांची या सरकारशी जवळीक देखील नाहीये. त्यामुळे रश्मी शुक्ला यांचा याही वेळेस पत्ता कट झाल्यात जमा असल्याची चर्चा आहे.
यांच्या व्यतिरिक्त सेवा ज्येष्ठतेनुसार १९८६ बॅचचे एस पी यादव, संजय पांडे, १९८७ बॅचचे बिपीन बिहारी, सुरेंद्र पांडे, डी कनकरत्नम, हेमंत नगराळे, १९८८ बॅचचे रजनीश शेठ, के व्यंकटेशम यांना ही मुंबई पोलीस आयुक्त पदाची अपेक्षा आहे.