मुंबई- औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या वादात आता संजय निरुपम यांनी उडी घेतली आहे. शहरांची नावे बदलण्यापेक्षा रुग्णालयांकडे लक्ष दिले असते, तर १० लहान मुलांचा जीव वाचला असता, अशी टीका काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली आहे.
भंडारा येथील रुग्णालयात आग लागून १० लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. याबाबत काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शहरांची नावे बदलण्यासाठी जोर देण्यापेक्षा रुग्णालयांकडे लक्ष दिले असते तर १० मुलांचा मृत्यू झाला नसता असे म्हटले आहे. संजय निरुपम शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला काँग्रेसकडून विरोध सुरूच असल्याने नामांतरचा वाद आणखी वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे राजकीय वाद -
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी राज्यातील सत्ताधारी शिवसेना आक्रमक झाली आहे. मात्र नाव बदलून विकास होत नाही असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध केला आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडीचा नाही असे सांगितले आहे. संभाजीनगर नाव करण्यास समाजवादी पक्षानेही विरोध केला आहे. ऐतिहासिक नावे न बदलता नवीन जिल्हे बनवून त्यांना नावे द्यावीत, रायगडला संभाजी नगरचे नाव द्यावे, अशी मागणी समाजवादीचे आमदार अबू आझमी यांनी केली. तर आरपीआयनेही संभाजीनगर नाव करण्यास विरोध केला असून नाव बदलल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी या वादावर तोडगा निघेल असे म्हटले आहे.