मुंबई : शिवसेनेतील फुटी नंतर रामदास कदम यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्यास सुरुवात केली. रामदास कदमांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून माजी आमदार संजय कदम यांची घरवापसी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संजय कदम आणि रामदास कदम हे एकमेकांचे हाडवैरी आहेत. त्यामुळे सेनेत प्रवेश देऊन रामदास कदम यांच्या सहित आमदार योगेश कदमांची कोंडी करण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. लवकरच ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रामदास कदमांची कोंडी ? : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांचे शिवसेना पक्षप्रमुखांनी विरोधात सुरत मध्ये जाऊन बंड केला. कोकणातील सहा आमदारांनी शिंदे गटाची वाट धरली. दापोली - खेड- मंडणगड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार योगेश कदम हे देखील शिंदे गटात गेले. योगेश कदम हे एकेकाळच्या शिवसेनेतील आक्रमक नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. तसेच ठाकरेंवर टोकाचे आरोप देखील केले. ठाकरेंकडून कदमांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देणे टाळत आले. मात्र, आता थेट मतदारसंघातच रामदास कदमांची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे.