मुंबई : सध्या राज्याच्या विधिमंडळात लव्ह जिहादवरून गदारोळ सुरू आहे. भारतातील अनेक मुली तसेच महिलांची फसवणूक करून इतर देशांमध्ये विकल्या जात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू असतानाच एक महिला मात्र आखाती देशांमध्ये तस्कर करून नेलेल्या महिला आणि मुलींसाठी लढा देत आहे. या अस्सल मराठी महिलेने थेट आखाती देशांमध्ये घुसून हजारो मुलींची आणि महिलांची सुटका केली आहे. या महिलेने थेट आखाती देशांमध्ये जाऊन भारतीय महिलांची सुटका केली आहे.
कोविडनंतर तस्करीचे प्रमाण वाढले : संगीता पाटील असे या धाडसी महिलेचे नाव असून त्या मुंबईमध्ये एका सामाजिक संस्थेसाठी काम करतात. आपल्या या थरारक प्रवासाबाबत ईटीव्हीसोबत बोलताना संगीता पाटील यांनी सांगितले की, कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यावेळी रोजगारासाठी अनेक जण इतरत्र संधी शोधत होते. यामध्ये सुशिक्षित लोकांची संख्या अधिक होती. याच काळात सुशिक्षित महिलांना आखाती देशांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांची तस्करी करण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या. मला जेव्हा या तस्करीबाबत माहिती मिळाली तेव्हा मी या संपूर्ण विषयावर आधी अभ्यास केला. त्यानंतर मी ओमानमध्ये जाऊन या महिलांची सुटका करण्याचा निर्णय घेतला.
जस्ट डायल महत्वाचा दुवा : पुढे बोलताना संगीता पाटील म्हणाल्या की, मी जेव्हा या संपूर्ण प्रकरणांचा अभ्यास केला त्यावेळी माझ्या लक्षात आलं, ही जी काही तस्करी झालेली आहे त्याच्यामध्ये एक समान दुवा आहे. तो म्हणजे 'जस्ट डायल' हा नंबर. यातील बहुतांश लोक हे जस्ट डायलच्या संपर्कातून एजंटला कनेक्ट झाले आणि त्या एजंटने या महिलांची आखाती देशांमध्ये विक्री केली. त्यामुळे या महिलांनी ज्या प्रकारे आखाती देशांमध्ये जायला जे काही केलं तेच मी करण्याचं ठरवलं. त्याच घटना क्रमाप्रमाणे मी देखील जस्ट डायलशी संपर्क साधला. त्यांनी मला काही एजंटचा नंबर दिला जे आखाती देशांमध्ये तुम्हाला नोकरी देतात.
ओमानमध्ये मजुरांची कमी : आम्ही जेव्हा संगीता पाटील यांना आखातीन देशांमध्ये नोकरी देतात म्हणजे नोकरीचे नेमकं स्वरूप काय असतं? हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, "ही नोकरी म्हणजे घरकाम, नर्स, केअर टेकर अशा स्वरूपाची असते. ओमान हा एक श्रीमंत देश आहे. त्यामुळे त्या देशांमध्ये जवळपास सर्वच लोक अरबपती आहेत. त्या देशात खालच्या दर्जाची काम करायला हलकी काम करायला कोणीही स्थानिक मजूर नाहीत. त्यामुळे त्यांना मजुरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. मला जस्ट डायल कडून नंबर मिळाल्यानंतर मी काही एजंटची संपर्क साधला. तेव्हा एजंटने मला ओमानमध्ये जाण्याचं कारण विचारलं. मी त्यांना नोकरी हे कारण सांगितले.
3 लाखात माझी विक्री : सुटकेचा थरार सांगताना संगीता पाटील पुढे म्हणाल्या की, एजंटने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माझा पासपोर्ट विजा तयार केला आणि माझ्या विमानाचे तिकीट काढून दिला. मी जेव्हा ओमानमध्ये पोहोचले त्यावेळी एक साधारण 23 ते 25 वयाचा तरुण मला घेण्यासाठी ओमान विमानतळावर आला होता. त्याची भाषा मला कळत नव्हती माझी भाषा त्याला कळत नव्हती. मात्र, त्याच्याकडे माझा फोटो होता आणि माझ्याकडे त्याचा फोटो होता. तो मला ओमान विमानतळापासून जवळपास 60 ते 70 किलोमीटर दूर असलेल्या एका शहरात घेऊन गेला. तिकडे गेल्यावर मला कळाले की माझी तीन लाख रुपयांमध्ये विक्री करण्यात आली आहे.
घरच्यांना देखील माहिती नाही : पुढे बोलताना संगीता पाटील यांनी सांगितले की, जेव्हा तो तरुण मला भेटला त्यावेळी त्याने माझा पासपोर्ट काढून घेतला होता. मात्र, माझा मोबाईल माझ्याकडे होता. मी घरी खोटे सांगून बाहेर पडले होते. पोलिसांना देखील खोटे सांगितले होते. मी सर्वांना नोकरीचे कारण देऊन ही रिस्क घेतली होती. मात्र, माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मी संपर्कात होते. मी काय करते, कुठे जाते याची इतमभूत माहिती मी त्या सर्व कार्यकर्त्यांना वेळोवेळी देत होते. आमच्याच संघटनेचा एक कार्यकर्ता ओमानमध्ये आहे. तो सतत माझ्या संपर्कात होता. मी सर्वांना सांगून ठेवलं होतं जर दोन दिवस माझ्याशी संपर्क होऊ शकला नाही तर समजून जायचं मी संकटात आहे. त्यानुसार सर्व अलर्ट होते.