मुंबई - नितेश राणेंनी जे केलं ते योग्यच केले. त्यांची सरकारने लवकरात लवकर सुटका करावी, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आमदार नितेश राणेंनी उपाअभियंत्यांवर चिखलफेक केली होती. याप्रकरणी संदीप देशपांडेंनी राणेंना पाठिंबा दिला आहे.
नितेश राणेंवर सक्षमपणे कारवाई करणारे सरकार, ज्या इंजिनियर्समुळे हजारो लोकांचे बळी गेले. ज्या लोकांचे हातपाय गेले त्यांच्यावर सरकार कधी कारवाई करणार? असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी यावेळी केला. लाखो रुपये पगार घेऊन जर अधिकारी योग्य प्रकारे काम करणार नसतील तर लोकप्रतिनिधींनी जाब कोणाला विचारायचा असेही देशपांडे म्हणाले.
अधिकाऱ्यांना चांगली भाषा समजत नसेल तर त्यांना योग्य भाषेत सांगावे लागेल असेही देशपांडे म्हणाले. त्यामुळे नितेश राणेंनी केले ते योग्यच केले असे म्हणत देशपांडेंनी नितेश राणेंचे समर्थन केले. सरकारने नितेश राणेंची लवकरात लवकर सुटका करुन दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.