मुंबई Samruddhi Mahamarg Accident : नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहिर करण्यात आलीय. केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख तर राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चानं योग्य ते उपचार करावेत असे निर्देश मुख्यनमत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींनी शोक व्यक्त केलाय.
काय म्हणाले मुख्यमंत्री : "नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या टेम्पो अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चानं योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोनं ट्रकला धडक दिल्यामुळं त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचं समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आलंय, याविषयीही माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळं झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त : नरेंद्र मोदींनी ट्विट करुन अपघातावर शोक व्यक्त केलाय. अपघाताच्या वृत्तानं अतिशय दु:ख झालं असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसंच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचंही मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
अपघातातील मृतांना श्रद्धांजली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवासांनीही ट्वीट करत अपघातील मृतांना श्रद्धांजली वाहिलीय. तसंच मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसंच जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्याच्या सूचना दिल्याचं फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
दुःखात आम्ही सर्वजण सहभागी : समृद्धी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हिच प्रार्थना, असं ट्विट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलंय. तसंच समृद्धी महामार्गावर आजवर एकूण 729 अपघात झाले आहेत. यात 262 गंभीर स्वरूपाचे अपघात झालेत. तर 47 अपघातांच्या घटनेत आजवर 101 प्रवाशांचा मृत्यू झालाय. यातून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, या महामार्गावरील सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य ती पाऊले उचलली पाहिजेत, अशी मागणीही शरद पवारांनी केलीय.
अत्यंत भीषण अपघात : नागपूर समृध्दी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा झालेला अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावं लागलं, हे वृत्त अत्यंत दुःखद, वेदनादायी असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलीय. तर या अपघातातील जखमींवर तातडीनं, सर्वतोपरी उपचार शासकीय खर्चानं करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्याबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा :
- Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर १२ जणांचा मृत्यू, पंतप्रधान कार्यालयाकडून मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर
- Samruddhi Mahamarg Accident : महामार्गावरील आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करा; अपघातानंतर दानवेंची मागणी, पहा व्हिडिओ
- Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी' नव्हे 'मृत्यूचा' महामार्ग? आजपर्यंत अपघातांत किती जणांचा मृत्यू? काय आहेत अपघातांची कारणं, वाचा सविस्तर