मुंबई -वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा, असे सांगत राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर शिवसेनेच्या मुखपत्र 'सामना' अग्रलेखातून टीका केली आहे.
मात्र, मनसेवर टीका करताना शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले आहे. देशात शिरलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकलून द्या. नव्हे हाकलायलाच पाहिजे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाने झेंडाच बदलावा ही गोष्ट गमतीची आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा -चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घूणपणे खून करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
‘मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत. बाळासाहेबांच्या एखाद्या जुन्या भाषणाची जशीच्या तशी ‘कॉपी’ वाचून दाखवली गेली. मग त्यात मंदिराच्या आरत्या, मुसलमानांचे नमाज, बांगलादेशींची हकालपट्टी हे विषय जसेच्या तसे आलेच आहेत.