मुंबई :कॉर्डेलिया क्रूजवर कथित आर्यन खान ड्रग प्रकरणांमध्ये नवीन वळण समोर आलेले आहे. आर्यन खानचे नाव शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकले, असा मोठा दावा त्या संदर्भातील चौकशी अधिकाऱ्याकडूनच केला गेलेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत समीर वानखेडे यांना दिलासा दिला. मात्र मुंबई उच्च न्यायालयात याबाबत दावा दाखल करावा, असे म्हटले होतो. त्यामुळे सुट्टीकालीन न्यायालयात आज समीर वानखेडे यांनी दावा दाखल केला. अतिक अहमद सारखी घटना आपल्यासोबत होण्याची भीती समीर वानखेडे यांना आहे, त्यामुळे त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे विशेष सुरक्षा पुरवण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
चौकशी आणि तपासासाठी सहकार्य करावे : मुंबई उच्च न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये 22 मे 2023 पर्यंत जबरदस्तीने कोणतीही अटक सीबीआयने समीर वानखेडे यांना करू नये. तसेच चौकशी आणि तपासासाठी समीर वानखेडे यांनी देखील सहकार्य करावे, असे आपल्या निर्देशात म्हटले आहे. आज त्यांच्या अटकेपासून संरक्षणाची तारीख संपत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात त्यांची सुनावणी होणार आहे. तसेच त्यांना सीबीआय कार्यालयामध्ये नित्य नियमाने चौकशीसाठी जावे लागत आहे.