मुंबई- भारतीय सेनेच्या दिल्ली मुख्यालयाकडून खासदार संभाजीराजे छत्रपतींचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जनरल ऑफिसर कमांडिंग, कर्नल ऑफ दी रेजिमेंट(मराठा लाईट इंफंट्री) लेफ्ट. जन. मिस्त्री यांनी त्यांच्या सैन्याविषयीच्या कार्याची दखल घेत हा सन्मान केला. या सन्मानाबाबतची माहिती संभाजीराजेंनी ट्विटरवरून दिली आहे.
लेफ्ट. जन. मिस्त्री हे आता मराठा लाईट इंफंट्रीचे प्रमुख आहेत. यांनीच यावर्षी, प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व केले होते. त्यांच्याच हस्ते छत्रपती घराण्याचा सदस्य म्हणून सैन्यदला विषयी देत असलेल्या योगदानाबद्दल खासदार संभाजीराजेंचा सन्मान केला. झालेला हा सन्मान आयुष्यातील बहुमोल सन्मान असल्याची भावना संभाजीराजेंनी व्यक्त केली.
संभाजीराजे म्हणाले, भारतीय सैन्य दलांचे आणि छत्रपती घराण्याचे शेकडो वर्षांचे घनिष्ठ नाते आहे. ती उज्ज्वल परंपरा जपून पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करत आहे. राजकीय, सामाजिक जीवनात कितीही व्यस्त असलो तरी, वेळात वेळ काढून मी सैन्य दलांच्या अधिकारी आणि सैनिकांच्या भेटी घेत असतो. सैन्य दलाच्या अनेक कार्यक्रमांना जात असतो. छत्रपती घराणे आणि सैन्याला एकत्र जोडून ते नाते अजून घट्ट कसे करता येईल, यासाठी माझे सदैव प्रयत्न असतात.
संभाजीराजे छत्रपती सध्या उत्तर भारतच्या दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी ते भारताच्या सरहद्दीवर( वाघा बाँर्डर)बिटिंग रिट्रीट सेरेमनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज याठिकाणी आलेले आहेत ही वार्ता तेथील लोकांना समजली आणि त्यांनी उस्फुर्तपणे त्यांचे स्वागत केले. महाराजांच्या नावाच्या जयघोषाने सीमेवरचा आसमंत दुमदुमून गेला होता. हे प्रेम, ही आत्मियता, पाहून मन भारावून गेले, डोळे अक्षरशः पाणावले. महाराष्ट्राच्या मायभूमिपासून हजारो किलोमीटर दूर, आमच्या रणमर्द मावळ्यांचा उत्साह, त्यांची माझ्याविषयीची प्रीती मनाला शिवणार नाही तर काय? अशी भावना संभाजीराजांनी व्यक्त केली.
देशाची संस्कृती टिकली ती शीख आणि मराठ्यांच्या तलवारीच्या जोरावर-संभाजीराजे छत्रपती यांनी अमृतसरलाही भेट दिली होती. देशाची संस्कृती टिकली ती शीख आणि मराठ्यांच्या तलवारीच्या जोरावर. संत नामदेवांनी घुमानमध्ये राहून केलेलं प्रबोधन असेल, किंवा नववे शीख गुरु गुरु गोविंदसिंहांना महाराष्ट्रात मराठ्यांनी केलेल्या सहकार्य असेल या दोन्ही मूळे सांस्कृतिक आणि पराक्रमी एकोपा जपला गेला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.