मुंबई :महाराष्ट्र राज्याची अंदाजे लोकसंख्या १२ कोटी ४९ लाख इतकी आहे. राज्यात ५१२ शासकीय रुग्णालये आहेत. यामध्ये खाटांची संख्या २७ हजार ३३७ इतकी आहे. राज्याची सरासरी लक्षात घेता २ लाख ३४ हजार ६०१ लोकसंख्येमागे एक रूग्णालय किंवा ४२६४ लोकांमागे एक खाट उपलब्ध आहेत. जागतिक आरोग्य सेवेच्या निकषानुसार ४० लोकसंख्येमागे एक रुग्ण खाट असणे आवश्यक आहे. राज्यात मात्र ४२६४ लोकांमध्ये एक रुग्ण खाट उपलब्ध आहे. महासत्ता व मेक इन महाराष्ट्र बनवित असताना आरोग्यसेवेबाबत मात्र आपण आफ्रिकन देशाशी स्पर्धा करीत आहोत, हे वास्तव आहे. राज्यातील जिल्हानिहाय रुग्ण खाटांची अवस्था पाहिल्यास आपल्या आरोग्य सेवेचा दर्जा लक्षात येतो. याचा अर्थ आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय अवस्था होईल? याचा शासनाने विचार करणे गरजेचे आहे, असे अहवालात म्हटले आहे.
इतकी रुग्णालय, खाटा वाढल्या :वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण रुग्णालयांची संख्या ५०३ होती, तर खाटांची संख्या होती २६ हजार ८२३ इतकी होती, तर वर्ष २०२२-२३ मध्ये रुग्णालयांची संख्या ५१२ इतकी झाली तर खाटांची संख्या ५१४ ने वाढून २७ हजार ३३७ इतकी झाली आहे. वर्ष २०११-१२ मध्ये जिल्हा रुग्णालयांची सख्या २३ इतकी होती ती वर्ष २०२२-२३ मध्ये १ ने कमी होऊन २२ इतकी झाली आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये १३ रुग्णालयात छाटांची संख्या ६ हजार १६९ इतकी होती. ती वर्ष २०२२-२३ मध्ये १ हजार ३६ ने कभी होऊन ५ हजार १३३ इतकी झाली आहे.