मुंबई -देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या हिंसेच्या घटनेवरुन शिवसेनेने मुखपत्र सामनातून गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. सावरकरांच्या गौरवासाठी जे राजकीय नौटंकी करत आहेत, त्यांनी देशाच्या गौरवाचा विचार करावा. दिल्लीतील हिंसेचा धूर देशाला गुदमरुन टाकत असताना, देशाचे गृहमंत्री कुठे आहेत? असा सवाल सेनेने केला आहे. देशाची अर्थव्यवस्था साफ कोसळत असताना, भडकाऊ भाषणांचा बाजार जोरात असल्याचे म्हणत शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे.
केंद्रात काँग्रेसचे सरकार असते तर?
दिल्लीच्या दंगलीत आत्तापर्यंत ३८ जणांचे बळी गेले आहेत. तसेच तेथे सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. असा वेळेस केंद्रात जर काँग्रसचे किंवा अन्य आघाडीचे सरकार असते तर विरोधी बाकांवर भाजपचे महमंडळ असते. त्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता. तसेच त्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत मोर्चे व घेरावचे आयोजन केले असते. गृहमंत्र्यांवर अपयशाचे खापर फोडले असते. मात्र, आता तसे होणार नाही. कारण भाजप सत्तेत आहे आणि विरोधी पक्ष कमजोर असल्याचे सेनेने म्हटले आहे. तरीही काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
३८ बळी गेले असताना अर्धे मंत्रिमंडळ अहमदाबादमध्ये
दिल्लीत ३८ जणांचा जीव गेला असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना 'नमस्ते ट्रम्प' करण्यासाठी अर्धे मंत्रिमंडळ अहमदाबादमध्ये गेले होते असा आरोपही सेनेने केला आहे. त्यानंतर तब्बल ३ दिवसानंतर पंतप्रधान मोदींनी शांतता राखण्याचे आवाहन केले. ४ दिवसानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल दिल्लीच्या रस्त्यांवर लोकांशी संवाद साधताना दिसले. त्याने काय होणार? असा सवालही सेनेने उपस्थित केला आहे. जे व्हायचे ते नुकसान आधीच झाल्याचेही सेनेने म्हटले आहे.