महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोनातून एकही धर्म वाचला नाही, देवांनी मैदान सोडलं' -

कोरोनाचे संकट हे शेवटी देवांवरही भारी पडल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून म्हटले आहे. निसर्गान मानवी अहंकाराचा, धर्माचा केलेला हा पराभव आहे. कोरोनाच्या संकटापुढे देवांनीही मैदान सोडल्याचेही सेनेने म्हटले आहे.

samana comment on corona effect on temples and pilgrimages
कोरोनातून एकही धर्म वाचला नाही

By

Published : Mar 22, 2020, 11:17 AM IST

Updated : Mar 22, 2020, 2:58 PM IST

मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. हे संकट म्हणजे निसर्गाने मानवी अहंकाराचा, देव-धर्माचा केलेला पराभव आहे. कोरोना प्रकरणात स्वत: देवांनाच संरक्षण देण्याची वेळ आली असून, देवांनीही मैदान सोडल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून केले आहे. कोरोनामुळे सर्व धर्म आणि ईश्वरही निरुपयोगी झाल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

एक विषाणू देवांवर भारी

हिंदू, मुस्लीम, बुद्ध असे सर्वच धर्मीय देश या संकटापुढे हतबल झाले आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर कोरोनाच्या भीतीने देवळे बंद करावी लागली आहेत. भक्तांचा ओघ आहे म्हणून, मंदिरातील दगडी मूर्तींना देवत्व प्राप्त होते. आता भक्तांचा ओघच थांबला, त्यामुळे कसले देव? आणि कसले देवत्व? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. देवांनी अनेक असुरांचा वध केला, असे पुराणात सांगितले गेले, पण एक विषाणू देवांवर भारी पडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या हल्ल्यातून एकही धर्म वाचला नाही

पुजारी मंदिरातील मुर्तींना मास्क लावून धर्कांड करत आहेत. सर्वच धर्मांनी त्यांच्या ठेकेदारांनी कोरोनाच्या भितीने मानवांना असहाय्य अवस्थेत सोडून दिले आहे. धर्मासाठी हिंदुस्थानासह जगभरात रक्तपात आणि हिंसाचार होतो, पण कोरोनाच्या हल्ल्यातून एकही धर्म वाचला नसल्याचे सेनेने म्हटले आहे. सर्वच धर्माच्या ठेकेदारांना आता खात्री पटली आहे की, अल्ला आता आपल्याला कोरोनापासून वाचवायला तयार नाही, फक्त यातून वैज्ञानिकच वाचवू शकतील असे राऊत यांनी म्हटले आहे.

गाडगेबाबांनी सांगितले तेच शेवटी खरे ठरले

कोरोनाचा सामना करण्यासाठी देवही तोकडे पडले आहेत. गोमांस घरात ठेवण्यावरुन माणसे मारण्यात आली. पण जे गोमांस खात नाहीत ते पण कोरोनाचे शिकार झाल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शेवटी महाराष्ट्रात गाडगेबाबांनी जे सांगितले तेच खरे ठरले. नवस, आवस, देव धर्म खरा नाही. मानवता हाच खरा धर्म. देवळात जाऊ नका, मूर्तीची पूजा करू नका, हेच खरे ठरल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मोदींना टोला

कोरोना व्हायरस आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदुस्थानातच अडकून पडावे लागले. ही लाभाची गोष्ट असल्याचे म्हणत राऊतांनी मोदींनाही टोला लगावला. देशात संपत्ती नाही म्हणून देश भिकारी होतो किंवा देशात संपत्ती असूनही समान वाटणी झाली नाही म्हणजे देश भिकारी होतो. आता मात्र, कोरोनामुळे देश आणि जग भिकारी होताना दिसत आहे. अंबानीपासून अदानिपर्यंत श्रीमंत थोडे गरीब झाले आहेत. तसेच देवही गरीब झाले आहेत. भक्तांशिवाय नेते आणि देवांनाही श्रीमंती नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Last Updated : Mar 22, 2020, 2:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details