मुंबई - पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका, महाराष्ट्रातील राजकारणात 'पहाट' योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही, हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत. असे म्हणत शिवसेनेने भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखातून पुन्हा भाजपाला लक्ष्य करण्यात आले आहे. संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीचे भाष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार शिवसेनेने घेतला आहे.
'पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर', सेनेचा जोरदार पलटवार
दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखात चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर टीका करण्यात आली आहे.
राज्याच्या राजकारणात ‘वन फाइन मॉर्निंग’ अचानक काहीतरी घडेल, असे भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तविल्यापासून अनेकांचे घोडे स्वप्नातच उधळू लागले आहेत. फाइन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांतदादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वगैरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वगैरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाइन मॉर्निंगला बोलावणे येईल म्हणून ते झोपतच नाहीत, चंद्रकांतदादांना फाइन मॉर्निंगला काहीतरी घडेल असे वाटते. हे काही चांगल्या प्रकृतीचे ‘साइन’ नाही, असा सवाल करत चंद्रकांत पाटलांना सेनेने टोला लगावला आहे.
एकतर अशा फाईन मॉर्निंगचा अचानक प्रयोग भाजपाने याआधी केलाच आहे, पण त्या फाईन मॉर्निंगला जे घडले ते पुढच्या 72 तासांत दुरुस्त झाले. याचे भान सध्या फक्त देवेंद्र बाबूंनाच आहे. भाजपला महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची घाई नाही. हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. त्याच वेळी एखाद्या फाईन मॉर्निंगला काहीतरी घडेल असा मंतरलेला संदेश चंद्रकांत पाटील देत आहेत. लोकांनी आता काय समजायचे? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सध्याचे सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांच्या मनातही नाही. पण चंद्रकांत दादांना पहाटे पहाटे सध्या जाग येत आहे. त्यांची झोपमोड होते की ते दचकून गचकन जागे होतात यावर पुढचे बरेच काही अवलंबून आहे. आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे, असा आध्यात्मिक विचारही दादांनी पहाटेनंतरच्या सूर्योदयास मांडला आहे, असेही सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने म्हटलं आहे.
मध्यावधी निवडणुकांची भाकितं करुन त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल, तर ‘घडाळ्या’चे काटे गतिमान आहेत. यावेळी वेळा चुकणार नाही याची खात्री बाळगा. सोबतीला हात आहे. हातावर घड्याळ आहे. घड्याळातून पहाटेचा गजर काढून टाकला आहे. अजित पवारांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घड्याळ भिंतीवर लावले आहे. ते टोले सतत वाजत असतात. त्यामुळे सगळेच जागते रहोच्या भूमिकेत आहेत. टोल्यांच्या आवाजामुळे भाजपच्या दादांची पहाट खराब होत असेल तर तो त्यांचा प्रश्न? असेही शिवसेनेने म्हटले आहे.