मुंबई - सलग १८ तास अभ्यास करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. शनिवारी पहाटे ६ वाजल्यापासून माटुंग्यातील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अभिवादनाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी मध्यरात्री १२ पर्यंत अभ्यास सुरू राहणार आहे. १५० हुन अधिक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असून ५० विद्यार्थ्यांनी या अभिवादनामध्ये सहभाग घेतला आहे.
या अभियानामध्ये कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा, डिग्री, पीएचडी, अशा ९ विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही या अभियानात सहभागी झाले आहेत. तसेच प्रा. डॉ. बी. बी. मेश्रामही यावेळी १८ तास संविधान या विषयावर अभ्यास करत आहेत. मेश्राम हे १९९३ पासून व्हीजेटीआयमध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांबरोबर अभ्यास करून छान वाटत आहे. बाबासाहेबांनी खूप कष्ट करून सर्वाना दिशा दाखवली. त्यांच्याकडील काही गुण युवापिढीने घेणे अपेक्षित असल्याचे मेश्राम यांनी यावेळी सांगितले.