कटिंगला संधी मात्र दाढीवर बंदी; राज्यात सलून, जिम होणार सुरू - राज्यात जिम सुरू होणार
राज्यात केश कर्तनालय आणि जिम सुरू होणार आहेत. केश कर्तनालय सुरू करताना सरकारने निर्बंध लावले असून तूर्तास मास्क घालून फक्त कटिंग करता येणार आहे, दाढी करता येणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

मुंबई- लॉकडाऊनमुळे बंद असलेला सलून व्यवसाय अखेर महाराष्ट्रात पुन्हा सुरू होणार आहे. राज्य सरकारने येत्या रविवारपासून म्हणजे २८ जूनपासून सलून आणि जीम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. जिम आणि सलून या आठवड्यात सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. केश कर्तनालय सुरू करताना सरकारने निर्बंध लावले असून तूर्तास मास्क घालून फक्त कटिंग करता येणार आहे, दाढी करता येणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडी सरकारने याबाबतचा निर्णय घेतला. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनदरम्यान सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र, अनलॉकनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले.
विमान सेवा, एस टी सेवा, दारू विक्रीसाठी जे सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत, त्याप्रमाणेच नियम पाळून सलून व्यावसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी सलून व्यावसायिकांनी केली होती.
एकीकडे अन्य व्यवसायांना परवानगी दिली असताना, सलून व्यवसायाला परवानगी का नाही, असा सवाल नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी विचारला होता. कोरोना काळातील लॉकडाऊन आणि अनलॉकनंतर हळूहळू बहुतेक सेवा पूर्ववत होत आहेत. मात्र, राज्यातील सलून व्यवसाय अद्याप बंद आहेत. ही सेवा नियम-अटींसह सुरू करू द्यावी, अशी मागणी सलून व्यावसायिकांकडून सातत्याने केली जात होती. त्यातच नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली होती. त्यानुसार आता सलून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २८ जूनपासून महाराष्ट्रातील सलून सुरू करण्यात येतील.