मुंबई :मुंबईमध्ये २६ जुलै २००५ मध्ये जल प्रलय आला होता. त्यावेळी नाल्यांमध्ये प्लास्टिक थैल्या अडकून पडल्याचे समोर आले होते. अशाच प्लास्टिक थैल्या समुद्रातही टाकल्या जात असल्याने समुद्री जीवाला आणि पर्यावरणावर याचा परिणाम होत होता. त्यामुळे राज्य सरकारने सिंगल युज प्लास्टिकवर जून २०१८ मध्ये बंदी घातली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादन करणार्यांवर कारवाई करण्यास मुंबई पालिकेने सुरुवात केली.
कोरोनामुळे कारवाई बंद :मुंबईत प्लास्टिक थैल्या आढळून येणाऱ्या दुकानदारांकडून प्लास्टिक जप्त करणे, दंड वसुली करणे, कोर्टात केसेस दाखल करणे यासारखी कारवाई पालिकेकडून केली जात होती. मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. कोरोनामुळे लॉकडाउन लागल्याने सर्व व्यवहार बंद असल्याने पालिकेने प्लास्टिक विरोधातील कारवाई थांबवली होती. कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्यावर सरकारने निर्बंध उठवले. त्यानंतर १ जुलै २०२२ पासून ही कारवाई पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या उपलब्ध : मुंबईमध्ये गणेशोत्सव, दहीहंडी, दिवाळी आणि होळी धुलिवंदन हे सण मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जातात. होळी आणि धूलिवंदन सणाच्या काही दिवस आधीपासून मुंबईच्या दुकानांमध्ये प्लास्टिक थैल्या पुन्हा विकल्या जातात. या थैल्या ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या आहेत. झोपडपट्टी, चाळी आदी विभागातील दुकानांमध्ये या पिशव्या सहज उपलब्ध आहेत. १० रुपयाला १०० पिशव्या विकल्या जात आहेत. या पिशव्यांचा वापर पाणी भरून लोकांवर मारण्यासाठी केला जातो.